आंध्र प्रदेशच्या अपहरणकर्त्यास अटक : बोपोडीतील घटना
खडकी : सुमारे सहा फुट उंच, धिप्पाड देहयष्टी आणि अंगात केवळ ट्र्ॅक पँट असलेल्या इसमाने दारात खेळत असलेल्या सहा वर्षीय बालिकेचे तोंड दाबून पळवुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जागरूक आई व मावशीने त्याला भिडत जोरदार प्रतिकार करत तो हाणून पाडला. तसेच अपहरणकर्त्यास बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. या धाडसी महिलांचे परिसरात कौतुक होत आहे. ही घटना शुक्रवारी (दि.29 जून) सायंकाळी बोपोडी येथे घडली. महेश ओबलेश मळीयार (वय 30, रा. मु.पो.आकलेर ता.तिरुपती जि.आनंदपुर, आंध्र प्रदेश)असे अटक केलेल्या अपहरणकर्त्या आरोपीचे नाव आहे.
खेळणार्या रियाचे दाबले तोंड
या प्रकरणी राणी रुपेश पिल्ले (वय 28, देवबाई चाळ 49, मुंबई-पुणे रोड यांनी तक्रार दिली आहे. बोपोडी पोलिस चौकीमागे देवबाई चाळ येथे ही घटना सायंकाळी 6.30 ते 7 च्या दरम्यान घडली. फिर्यादी राणी यांची बहिण संजना या आपली मुलगी दिव्यासमवेत बहिणीकडे आली होती. सायंकाळी साडेसहा वाजता दिव्या आपल्या मावशीची मुलगी रियासोबत घरासमोर खेळत होती. त्यावेळी काळ्या रंगाचा, धिप्पाड देहयष्टीचा व अंगात केवळ टॅक पँट घातलेला मळीयार तेथे आला. थोडावेळ घुटमळत एकदम रियाचे तोंड दाबुन उचलून घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, रियाने मळीयारच्या हाताला चावा घेत आरडाओरड केली.
धिप्पाड अपहरणकर्त्याशी बहिणी भिडल्या
आवाज ऐकून तिची आई राणी व मावशी संजनासह चाळीतील लोक घराबाहेर आले. धिप्पाड मळीयारच्या पुढे जाण्याचे धाडस लोकांचे झाले. मात्र राणी व संजना यांनी निडरपणे त्याच्या अंगावर धावून जात रियाची सुटका केली. नंतर त्यास चोप देण्यास सुरूवात केली. दरम्यान, त्याने कशीबशी आपली सुटका करून पळ काढला. पिल्ले बहिणींनी त्याचा पाठलाग सोडलाच नाही. बोपोडी पोलिस चौकी शेजारी त्याला पकडलेच. त्यांच्यासोबत धावत आलेल्या इतर लोकांनीही त्याला बेदम चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांच्याही ताब्यातून पळ काढण्याचा प्रयत्न
रिया ही खडकी बाजार येथील एस.व्ही.एस.शाळेत पहिलीत, तर दिव्या चिखलवाडी येथील माता रमाबाई आंबेडकर शाळेत तिसरीत शिकत आहे. पोलिसांनी मळीयार याच्याकडे तपासकामी चौकशी सुरू केली असता तो तेलगु भाषेत बोलत आपल्याला मराठी हिंदी येत नसल्याचा बनाव करु लागला. मात्र, नंतर पोलिसी खाक्या दाखवल्यावर तो हिंदीमध्ये बोलू लागला. औंध येथील जिल्हा रुग्णालयात मळीयार यास वैद्यकीय तपासणीसाठी नेत असतानाही त्याने पोलिसांना हिसडा मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याला जेरबंद करूनच पोलीस ठाण्यात आणले.