जुन्नर । आई-वडील हीच खरी दैवतं आहेत. वृद्धापकाळात त्यांची सेवा करणे, काळजी घेणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. आपल्या आई-वडीलांना निराधार करू नका, आदराने वागणूक द्या. राजाराम पाटील वृद्धाश्रमाच्या वतीने निराधार वृद्धांना मोफत सांभाळले जाते आणि हे काम नोकरी सांभाळून तरुण मुले करतात. हे निश्चितच कौतुकास्पद कार्य आहे, असे गौरवोद्गार जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार सन्मान सोहळ्यात काढले.
पांगरीमाथा (ता.जुन्नर) येथील शिवनेर प्रतिष्ठान संचलित राजाराम पाटील वृद्धाश्रमात पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात आमदार सोनवणे बोलत होते. यावेळी आमदार सोनावणे म्हणाले, मुलांनो आई-वडिलांचा खूप मोठा त्याग आहे. म्हतारपणात त्यांना वार्यावर सोडू नका. त्यांना हवा असतो फक्त आधार आणि प्रेमाचा शब्द.प्रत्येकाला या अवस्थेतून जायचे आहे. याचे भान ठेवा. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पत्रकारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले, पत्रकारांच्या लेखणीत सामाजिक परिवर्तनाची खूप मोठी शक्ती आहे. लेखणीला रामशास्त्री प्रभुणे सारखे रूप द्या असे आवाहन केले.
मान्यवरांच्या हस्ते 25 पत्रकारांचा गौरव
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी आमदार शरद सोनवणे, देवराई संस्थेचे अध्यक्ष सुकणशेठ बाफना यांच्यासह जेष्ठ सामाजिक कार्यकर्तेब जे. एल. वाबळे, सेवा निवृत्त मुख्याद्यापक गोपाळे गुरुजी, बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील औटी, नागपूरचे प्रभाकर कारभार, शिवनेर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तांबोळी, सचिव मंगेश गाढवे, विश्वस्त संदीप पानसरे, फकीर आतार, सतीश मोरे, राजेंद्र पांडे, श्रीनाथ कामत, राजेंद्र पाटील, आम्ही आनंदी यात्री गीत समूहाचे प्रमुख प्रमोद सुर्वे, भानुदास कोकणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी जुन्नर शहर, ओतूर, मढ, उदापुर, लेण्याद्री या भागातील जवळपास 25 पत्रकार व आपला आवाज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अतुल परदेशी, पवन गाडेकर, सी 24 तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी साळवे, कॅमेरामन एल. दातखिळे आदींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौराव पत्र, सन्मान चिन्ह, शाल, पुष्प गुच्च देऊन गौरव करण्यात आला.
विश्व सर्वधर्म प्रार्थनेने शुभारंभ
या कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही आनंदी यात्री या गीत समूहाच्या विश्व सर्वधर्म या सुमधुर प्रार्थनेने झाला संस्थेची माहिती व प्रास्तविक विश्वस्त संदीप पानसरे यांनी केले तसेच लोकमतचे पत्रकार आनंद कांबळे, महाराष्ट्र टाइम्सचे प्रा. धर्मेंद्र कोरे व आपलाव आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एफ. बी. आतार यांनी केले तर विवेक तांबोळी यांनी आभार व्यक्त केले.