’आउटडेटेड’ असल्यामुळे भारतातील एटीएम बचावली

0

मुंबई । ’वॉन्नाक्राय’ या रॅन्समवेअरने दीडशेहून जास्त देशांतील कॉम्प्युटर यंत्रणांची वाट लावली असली, या व्हायरसचा भारतातील बँका आणि एटीएमवर काहीही परिणाम झालेला नाही. कारण भारतातील एटीएम यंत्रणा कालबाह्य किंवा ’आउटडेटेड’ असल्यानेच ते या हल्ल्यापासून सुरक्षित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

जागतिक बँका आपल्यापेक्षा खूप प्रगत तंत्रज्ञान वापरतात. त्या तुलनेत आपल्याकडील एटीएममध्ये वापरली जाणारी विंडोज एक्सपी यंत्रणा जुनी आहे. त्यामुळे त्यात वॉन्नाक्राय सहज प्रवेश करू शकेल, अशी भीती वर्तवण्यात आली होती. परंतु, अद्ययावत यंत्रणांना नुकसान पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या व्हायरसला जुनी यंत्रणा भेदता आली नाही. थोडक्यात, काळाच्या मागे असणे बँकांच्या पथ्यावरच पडले आहे.

भारताने मार्च महिन्यापासूनच पॅचेस (सॉफ्टवेअरमधील सुरक्षाविषयक अपडेट) इन्स्टॉल करण्यास प्रारंभ केला असून सर्व संबंधितांना वेळोवेळी सूचना पाठवल्या जात आहेत, भारत मालवेअरविरोधात आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्याही संपर्कात आहे, अशी माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यातील अशा हल्ल्यांपासून सुरक्षिततेसाठी पुढील महिन्यापासून सायबर कोऑर्डिनेशन सेंटर सुरू करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.