आकर्षक गणेश मूर्ती बाजारात दाखल

0

नेरुळ -: अवघ्या महाराष्ट्रतील आणि हिंदू धर्मियांचा सर्वाधिक असा लोकप्रिय आणि जिव्हाळ्याचा गणेशोत्सव सण अवघ्या सवा महिन्यावर येऊन ठेपला आहे . गणेश उत्सवाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. त्यातच समाजमाध्यमांवर येणाऱ्या नवनवीन आणि विविध पद्धतीच्या गणेश मूर्ती पाहून प्रत्येक घरात यंदा कोणत्या रूपातील मूर्ती आणायची याचे बेत आखले जात आहेत.

वाशी सेक्टर १५ ,सेक्टर १६आणि सेक्टर ९ मधे कल्याणकर कला केंद्रयांनी सुबक गणेश मूर्ती ग्राहकांसाठी आताच उपलब्ध करून ठेवल्या आहेत.या कला केंद्राचे उदघाटन नुकतेच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आणि नवी मुंबई परिवहन समिती सदस्य विक्रम (राजू ) शिंदे यांच्या हस्ते झाले.

मागील वर्षी जसे जय मल्हार आणि बाहुबलीच्या पेहराव असलेल्या मूर्तींनी भूरळ घातली होती. त्याच प्रमाणे यंदाही तशाच मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत.तर लालबागचा राजा आणि दगडूशेठ हलवाई रूपातील गणपतींची लोकप्रियता आद्यपक कमी झालेली नाही. याच आकारातील मूर्तींची सर्वाधिक नोंदणी झालेली आहे असे कल्याणकर केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. याचबरोबर बच्चे कंपनीसाठी खास बाळ गणेशाची मूर्ती देखील आकर्षणाची ठरत आहेत.तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे पर्यवरणाचे नुकसान याबाबत समाजमाध्यमांवर आतापासूनच फिरत असलेले व शाडूच्या मातीच्याच मूर्ती विकत घ्या असे आवाहन करणारे संदेश यामुळे शाडूच्या गणेश मूर्तींची मागणी यंदा जास्त आहे असे कल्यांकरांनी सांगितले.

या सर्व सुबक मूर्ती पेण मधून आणण्यात आल्या असून ग्राहकांच्या पसंती नुसार गणेश मूर्ती अधिक अलंकारांनी व विविध कृत्रिम खडे व चमकी लावून सजवून देण्यात येणार आहेत असे कल्याणकर कला केंद्राचे मालक सुनील कल्याणकर यांनी सांगितले.