आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी मोजले तब्बल 27 कोटी

0

पुणे । आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी असलेल्यांमध्ये वाढ होत आहे. परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयांतर्गत मागील आठ महिन्यांत 36 हजार जणांनी या क्रमांकांसाठी तब्बल 27 कोटी रुपये मोजले आहेत. तर सात जणांनी सरासरी प्रत्येकी चार लाख रुपये दिले आहेत. परिवहन विभागाकडून दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी काही आकर्षक क्रमांक राखून ठेवले जातात. यामध्ये 1, 100, 786, 4141 अशा विविध क्रमांकाचा समावेश असतो. प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या क्रमांकासाठी अर्ज मागवून त्यानुसार लिलाव पद्धतीने हे क्रमांक संबंधित वाहनासाठी दिले जातात. त्यासाठी चार लाख रुपयांपर्यंत बोली लावता येऊ शकते.

मागील वर्षी 37 कोटी 30 लाखांची कमाई
मागील आर्थिक वर्षामध्ये पुणे विभागाला या लिलावातून तब्बल 37 कोटी 30 लाख रुपयांची कमाई झाली होती. तर यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत विभागातून सुमारे 36 हजार चालकांनी आकर्षक क्रमांक घेतला आहे. यातून 27 कोटी 17 लाख रुपयांचे उत्पन्न आरटीओला मिळाले आहे.
पुणे विभागांतर्गत आरटीओ पुणे, उप प्रादेशिक परिवहन कार्यलय सोलापूर, पिंपरी चिंचवड, बारामती आणि अकलुज या कार्यालयांचा समावेश होतो. वाहनांना आकर्षक क्रमांकासाठी सर्वाधिक पसंती पुणे कार्यालयाला दिली जाते. त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडचा क्रमांक लागतो. एका क्रमांकासाठी चार लाख रुपये मोजणारे हौशी वाहनचालकही वाढू लागले आहेत. मागील आठ महिन्यांत सात चालकांनी सुमारे प्रत्येकी चार लाख रुपये मोजले आहेत. तर एक लाखांहून अधिक रक्कम मोजणार्‍यांची संख्या 129 एवढी आहे. यातून पुणे विभागाला सुमारे 2 कोटी 24 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आरटीओला यातून मिळणार्‍या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्षातील अद्याप चार महिने बाकी असल्याने यंदा नवीन नोंदणीतून मिळणारे उत्पन्न मागील वर्षीपेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे.

आठ महिन्यांतील कार्यालय निहाय नोंदणी व उत्पन्न
कार्यालय         नोंदणी संख्या          उत्पन्न

पुणे                   21486               15 कोटी 69 लाख
सोलापूर           2598                 1 कोटी 73 लाख
पिंपरी              9393                 7 कोटी 86 लाख
चिंचवड
बारामती          2282                1 कोटी 78 लाख
अकलुज          234                   12 लाख
एकूण            35993                27 कोटी 17 लाख