पुणे। पुण्याच्या वूमन इंटरनॅशनल मास्टर आकांक्षा हगवणे हिने वूमन ग्रँडमास्टर (डब्ल्यूजीएम) किताबाचा पहिला नॉर्म पूर्ण केला आहे. बोस्निया येथे झालेल्या बोस्निया इंटरनॅशनल ओपन बुद्धिबळ स्पर्धेत तिने हे यश मिळवले. ही स्पर्धा 11 ते 19 मे दरम्यान झाली. या स्पर्धेत 15 ग्रँडमास्टर, सहा इंटरनॅशनल मास्टर आणि चार वूमन इंटरनॅशनल मास्टर सहभागी झाल्या होत्या. आकांक्षाला (2283 रेटिंग) या स्पर्धेत 33वे मानांकन मिळाले होते. या स्पर्धेत ती अकराव्या स्थानावर राहिली. आकांक्षाने 9 फेर्यांमध्ये 6.5 गुण मिळवले. यात तिने पाच विजय, तीन बरोबरी आणि एक पराभव अशी कामगिरी नोंदवली. यामुळे अंदाजे 400 युरोचे रोख पारितोषिक मिळाले.
आकांक्षाने पहिल्या फेरीत लाकुसिस झोरनला नमविले. यानंतर तिला ग्रँडमास्टर निकोलिक प्रेड्रॅगकडून पराभव पत्करावा लागला. निकोलिक (2607 रेटिंग) अनुभवी खेळाडू आहे. निकोलिकविरुद्ध खेळण्याचा अनुभव आकांक्षासाठी मोलाचा ठरला. यानंतर तिने हॅलिलोविक फहरुद्दीनविरुद्ध विजय, स्लॅमर वेलिमिरविरुद्ध बरोबरी, मार्न जानविरुद्ध विजय मिळवला. ग्रँडमास्टर ब्लागोजेविच ड्रॅगिसाला (2480 रेटिंग) तिने बरोबरी रोखले, तर फिडे मास्टर मार्जानोविच डेजानला तिने नमविले. आठव्या फेरीत ग्रँडमास्टर ड्रास्को मिलानला बरोबरीत रोखले, तर नवव्या फेरीत इंटरनॅशनल मास्टर फिलिपोविच ब्रँकोला पराभूत केले. तिने 37 एलो रेटिंग पॉइंटची कमाई करून 2300 रेटिंगचा टप्पा ओलांडला. आता डब्ल्यूजीएम नॉर्मसाठी 2400हून अधिक रेटिंग तोडीची कामगिरी आवश्यक असते. या स्पर्धेत आकांक्षाची 2417 रेटिंग तोडीची कामगिरी झाली. डब्ल्यूजीएम होण्यासाठी तिला आणखी दोन नॉर्म पूर्ण करायचे आहेत.