पुणे । पूर्वीचे आणि आताचे पुणे यात कमालीचा फरक पडला आहे. उपनगरे विस्तारली आहेत. शहर आणि उपनगरे ‘प्रकाश’ प्रदूषणाच्या छायेखाली आहेत. आकाशनिरीक्षण करताना प्रकाश नको असतो. त्यामुळे निरीक्षणासाठी शहरांपासून लांब जावे लागते. कारण, आकाशनिरीक्षण प्रकाश व प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे, अशी खंत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.अॅडव्हेंचर फाउंडेशन या संस्थेतर्फे12वा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश तुपे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, वनमहर्षी मारुती चितमपल्ली उपस्थित होते.
शहरातील वीज काही काळ बंद ठेवावी
डॉ. नारळीकर म्हणाले, आकाश तुपे यांच्याशी माझा पूर्वीपासूनचा परिचय आहे. हडपसरला शेतात राहताना तुपे यांना आकाशदर्शनाची गोडी लागली. एकदा उल्कावर्षाव दिसणार आहे, असे समजल्यावर तुपे यांच्या विनंतीवरून मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ‘रात्रीच्या वेळी शहरातील वीज काही काळ बंद ठेवावी’, असे पत्र लिहिले. सुरक्षेच्या कारणास्तव असे करता येणार नाही, अशी दिलगिरी व्यक्त करणारे उत्तर त्यांच्याकडून मिळाले.
तरच शिक्षणाचा मूलभूत उद्देश पूर्ण
ताकवले म्हणाले, ज्ञानाने प्रश्न सुटणार असतील, जीवनविषयक दृष्टिकोन व्यापक होणार असेल, तर त्या शिक्षणाचा मूलभूत उद्देश पूर्ण होतो. ज्ञान केवळ ज्ञानासाठी मिळवायचे की जीवनासाठी, हे आपण ठरवायला हवे. चौकटीपासून मुक्त होणे, निसर्गाच्या जवळ जाणे, वैश्विकता, व्यापकता आत्मसात करणे हेच खर्या अर्थाने मूल्यात्मक शिक्षण आहे. निसर्गाचे तत्त्वज्ञान जीवनात आणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.
आजपर्यंत या कामाची दखल नाही
विवेक देशपांडे संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना निसर्गाचा परिचय तसेच गड-किल्ले, जंगलाचे दर्शन घडवत आहेत. शिस्तबद्ध कार्यक्रमातून हे ज्ञानार्जन केले जाते. मात्र, आजपर्यंत या कामाची दखल घेण्यात आलेली नाही. तरीही, ते अविरतपणे कार्यरत आहेत, असे मारुती चितमपल्ली यांनी सांगितले. विवेक देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कोठडिया यांनी सूत्रसंचालन केले.
डोळे, कान उघडे ठेवल्यास जंगल कळते
तुपे म्हणाले, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. राम ताकवले, मारुती चितमपल्ली यांसारख्या दिग्गजांचा सहवास मला लाभला. तोंड बंद ठेवले आणि डोळे, कान उघडे ठेवल्यास जंगल कळते, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. आकाशात भिरभिरणारी नजर खाली आल्यामुळे जंगल जाणून घेता आले. आकाशाप्रमाणे जंगलाच्याही प्रेमात पडलो.