शिर्डी। आकाशवाणी शिर्डी एफ.एम. केंद्राचे उदघाटन प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चंद्र पंडा यांच्या हस्ते व साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या उपस्थितीत झाले. साई समाधी मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात आकाशवाणीचे महासंचालक एफ. शहरयार, अतिरिक्त महासंचालक एम.एस. थॉमस, अतिरिक्त महासंचालक अजय गुप्ता, नगराध्यक्षा योगिता शेळके, साईबाबा विश्वस्त व्यवस्थाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे, उप कार्यकारी अधिकारी संदिप आहेर आदी उपस्थित होते.
तिरूपतीनंतर शिर्डीत केंद्र
यावेळी बोलताना प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चंद्र पंडा म्हणाले, या आकाशवाणी केंद्रामुळे शिर्डी व परिसरातील साईभक्तांची सोय होणार आहे. ऑक्टोबर 2017 पासून साईसमाधी शताब्दी वर्षाला प्रारंभ होणार आहे. त्या निमित्त आपत्तीनियोजनामध्ये या केंद्राचा उपयोग होईल तसेच साईआरती,भजन व इतरही कार्यक्रम ऐकता येतील. लवकरच या केंद्राची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. साईबाबा विश्वस्तव्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे म्हणाले, तिरूपती बालाजी देवस्थानानंतर शिर्डी येथे आकाशवाणीचे स्वतंत्र एफ. एम. केंद्र सुरू होत आहे. शिर्डीच्या इतिहासात हा आनंदाचा क्षण आहे. केवळ 21 दिवसात उभे राहणारे हे एकमेव केंद्र असेल असे नमूद करून भाविकांना आरती, भजनसंगीत ऐकावयास मिळेल. यावेळी आकाशवाणीचे महासंचालक एफ. शहरयार, अतिरिक्त महासंचालक एम.एस. थॉमस यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले. कार्यक्रम प्रमुख प्रदिप हलसगीकर यांनी आभार मानले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी स्वच्छ भारत अभियानाची साई संस्थानने प्रकाशित केलेली संकल्पना स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी मान्यवरांना भेट दिली. कार्यक्रमास उपमहासंचालक एम. शैलजा सुमन, पुणे आकाशवाणीचे उपमहासंचालक आशीष भटनागर, मुंबई आकाशवाणीचे उपसंचालक भूपेंद्र मिस्त्री, सहायक संचालक रवींद्र खासनीस, औरंगाबाद आकाशवाणीचे केंद्रप्रमुख अजय सुरवाडे, कार्यक्रम प्रमुख सिध्दार्थ मेश्राम, अहमदनगर आकाशवाणीचे केंद्रप्रमुख राजेश बेलदार, कार्यक्रम प्रमुख प्रदिप हलसगीकर, कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी, मुजम्मील पटेल, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक वर्षानंतर असंख्य नागरीकांच्या म्हणण्यानुसार या एफएम सुविधाची सोय करून दिली आहे. आता शिर्डीकरांसाठी ही सुविधा म्हणून जो उपक्रम राबविण्यात आला आहे तो अतिशय चांगला असल्याचे नागरीकाकडून बोलले जात आहे.