आमदार महेश लांडगे यांनी महसूलमंत्र्यांकडे केली मागणी
पिंपरी-चिंचवड : शहराची लोकसंख्या 25 लाखांपेक्षा जास्त आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये तहसील कार्यालय सुरु आहे. परंतु, जागा अपुरी, मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे या कार्यालयातून सुविधा अपु-या पुरविल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यासाठी तहसिल कार्यालयास स्वतंत्र जागा देण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
कार्याललास स्वत:ची जागा नाही
याबाबत निवेदनात म्हटले आहे, की शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये तहसील कार्यालय सुरु आहे. परंतु, या तहसील कार्यालयास स्वत:ची जागा नाही. मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे या ठिकाणी असणार्या सुविधाही अपु-या आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या कार्यालयातून आदिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला याशिवाय अन्य 20 दाखले दिले जातात. दरवर्षी महाविद्यालयीन प्रवेशाच्या काळात या ठिकाणी हजारो विद्यार्थी अर्ज करण्यासाठी येत असतात. यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते.
इमारत बांधकामासाठी निधी द्यावा
हे कार्यालय प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये असल्याने दिवसें-दिवस येथे गर्दी वाढत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी अस्तित्वात असलेल्या तहसील कार्यालयास अद्यावत इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच अपुर्या असणार्या कर्मचार्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी विनंती आमदार लांडगे यांनी केली आहे.