आकुर्डीतील महिलेचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. साथीच्या आजारांना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना अपूर्ण ठरत आहेत. एकीकडे स्वाईन फ्लूची साथ नियंत्रणात येत नसताना आता डेंग्यूनेदेखील डोके वर काढले आहे. आकुर्डीतील बालाजीनगरात राहणार्‍या एका 20 वर्षीय महिलेचा रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला. तिच्यावर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. चंद्रिका प्रीतम घोष (वय 20, रा. बालाजीनगर, आकुर्डी) असे त्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, डेंग्यूसदृश्य आजाराने चालू वर्षात शहरात पहिला बळी गेल्याचे मानले जात आहे.

28 जुलैला केले दाखल
चंद्रिका घोष यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना तीव्र ताप, चक्कर, अंगदुखी व अंगावर चट्टे अशी डेंग्यूसदृश्य आजाराची लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले होते. मात्र, रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पतीवरही यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. चंद्रिका यांच्या मृत्यू डेंग्यूसदृश्य आजाराने झाला असून, नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले आहे.