पिंपरी-चिंचवड । आकुर्डी येथील जय गणेशव्हिजन व चिंचवड स्टेशन परिसरात गुरुवारी पहाटे अडीच वाजता गेलेली वीज चक्क 17 तासानंतर म्हणजे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास आली. त्यामुळे स्थानिक नागरिक महावितरणच्या या सुपर फास्ट सेवेमुळे चांगलेच हैराण झाले होते. याविषयी स्थानिक नगरसेवकांनीही महावितरणच्या भोंगळ कारभारावर टीकेची झोड उठवली. पहाटे अडीचच्या सुमारास गेलेली वीज सकाळी नऊ-दहा वाजले तरीही आली नाही. त्यामुळे टाकीत पाणी चढवणे, गीजर लावणे किंवा मोबाईल चार्ज करणे अशा दैनंदिन गरजा पूर्ण करणे आकुर्डी व चिंचवड स्टेशनच्या नागरिकांना शक्य झाले नाही. महावितरणला संपर्क साधावा तर त्यांचा फोन बंद, मग सांगणार कोणाला. गेल्या दोन वर्षातील ही दुसरी घटना आहे. सलग 17 तास वीज नसल्याने नागरिकांची, कार्यालयाची बरीच कामे खोळंबली होती.
महावितरण प्रशासन अतिशय ढिम्म
याविषयी स्थानिक नगरसेवक प्रमोद कुटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महावितरण प्रशासन अतिशय ढिम्म आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी परिसरातील दुरुस्तीचे काम केलेले नाही, अगदी केबल बदलायचे असले तरी त्यांच्याकडे बजेटच नाही, अशी त्यांची ओरड असते. सध्या परिसरात तीन फिडर आहेत मात्र त्यातील केवळ एकच फिडर चालू आहे. त्यामुळे एकाच फिडरवर लोड आल्याने हा प्रकार घडला आहे, अशी तक्रार त्यांनी यावेळी केली.
परिसरातील ठिकाणांबाबत महावितरण अनभिज्ञ
महावितरणशी संपर्क साधला महावितरणच्या पिंपरी-चिंचवडच्या मुख्य कार्यालयात संपर्क साधला असता त्यांना पिंपरी-चिंचवड परिसरातील काही ठिकाणे आहेत कुठे हेच सांगता आले नाही, कसाबसा त्यांच्या ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधला तर तेथेही तीच ओरड, शेवटी नारिकांशी चर्चा केली असता संबंधीत अधिकारी त्यांचा फोन बंद करुन बसल्याचे कळाले. संपर्क साधला मात्र फोन बंद होता. शेवटी रात्री साडेसातच्या सुमारास संपर्क झाला. यावेळी गणेश व्हिजन भागातील वीज आलेली होती.
लवकरच परिसरात वीज येईल
याविषयी प्रशासनाने सांगितले की, बर्याच ठिकाणी तांत्रिक बिघाड आहेत. त्यामुळे आम्ही तो शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी केबल खराब आहे तर काही ठिकाणी फिडर यामुळे ती नादुरुस्ती शोधून आम्ही दुरुस्त करत आहोत. अद्याप आकुर्डीतील पंचतारानगर येथील तांत्रिक बिघाड शोधत आहोत ती सापडली की दुरुस्ती करुन संपूर्ण परिसराची वीज परत येईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांच्या फोनबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की सकाळपासून सर्व कर्मचारी कामावर आहेत त्यामुळे फोनची बॅटरी उतरली त्यात पाऊस यामुळे संपर्क झाला नाही. आम्ही आमचे काम लवकरच संपवणार असून, परिसरात वीजही लवकर येईल. असे महावितरणचे आकुर्डी विभागाचे अधिकारी पाटील यांनी सांगितले.