आठ दिवसांची मुदत : ‘हंडा’ मोर्चाचा नगरसेवकांनी दिला इशारा
पिंपरी चिंचवड : आकुर्डी, निगडी प्राधिकरण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पाणी नियमित आणि पुरेशा प्रमाणात येत नसल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्याचबरोबर प्राधिकरणातही समान पाणीपुरवठा होत नसून, आकुर्डी आणि प्राधिकरण परिसरातील पाणीपुरवठा येत्या आठ दिवसांत सुरळीत करावा. अन्यथा ‘अ’ श्रेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारानगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे आणि वैशाली काळभोर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आकुर्डी, प्राधिकरणातील अनियमित पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली, त्यावेळी संबंधित नगरसेवकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती देण्यात आली.
पाणीपुरवठा विस्कळीत
राजू मिसाळ म्हणाले, निगडी, प्राधिकरणातील पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झाला असून, पाणी कमी दाबाने येत आहे. पाणी येण्याची वेळही निश्चित नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. प्राधिकरणात केवळ 20 एमलडी पाणी येत असून, हे पाणी पुरेशे नसून, प्राधिकरणात समान पाणीपुरवठा होत नाही.
धरणात मुबलक पाणी
यावर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेशे पाणी मिळणे गरजेचे आहे. आता अशी तर उन्हाळ्यात काय परस्थिती येईल? असा सवाल प्रभागातील नागरिक विचारत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आयुक्तांनी आठ दिवसांची मुदत मागितली असून, त्यानंतरही सुधारणा न झाल्यास ‘अ’ श्रेत्रीय
कार्यालयावर ’हंडा’ मोर्चा काढण्यात येईल.
पुन्हा जैसे थे
नगरसेवक अमित गावडे म्हणाले, प्राधिकरणाच्या विविध भागात दोन्ही वेळा देखील पाणी येत नाही. याबाबत पाणीपुरवठा अधिकार्यांकडे तक्रार केल्यास दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत असतो, मात्र त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होते.
पाण्याची मोठी समस्या
नगरसेविका वैशाली काळभोर म्हणाल्या, प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी आणि आकुर्डीगावठाण प्रभागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची मोठी समस्या आहे. प्राधिकरण आणि आकुर्डी परिसराला एकाच टाकीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसून, प्रशासनाने या परिसरातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा.