आकुर्डी परिसरात भुरट्या चोरांसह टवाळखोरांचा उपद्रव वाढला

0

पिंपरी-चिंचवड : आकुर्डीतील पंचतारानगर आणि पांढरकर वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल चोरांचा सुळसुळाट झाला आहे. टवाळखोरांचा उपद्रवदेखील वाढला आहे. घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांमधील पेट्रोल काही वेळात गायब होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: चाकरमान्यांना याचा अधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणी तक्रार करीत नसल्याने चोरट्यांचे फावले आहे. या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकवस्ती दिवसेंदिवस वाढतेय
आकुर्डीत दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. उद्योगनगरीमध्ये बजाज, टेल्को या सारख्या बड्या कंपन्यांसह छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये सहा-सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी स्वरुपावर काम करणारा कामगारवर्ग येथे मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. काही जणांना कायमस्वरुपी नोकरी मिळाल्याने त्यांनी येथेच आपला संसार थाटला आहे. पै-पै जमा करून त्यांनी आपला संसार उभारला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये वाहनांमधील पेट्रोल तसेच भुरट्या चोर्‍या, टवाळखोरी वाढल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.

पोलिसांचे दूरून डोंगर साजरे!
आकुर्डी गावठाण हा संवेदनशील प्रभाग म्हणून ओळखला जातो. संघटीत गुन्हेगारीतून खून, हाणामार्‍या, गोळीबार या सारख्या गंभीर स्वरुपाच्या घटना दिवसाढवळ्या येथे घडलेल्या आहेत. या टोळ्यांच्या म्होरक्यांवर पोलिसांनी तडिपारीसारखी कारवाई केली असली तरी, या म्होरक्यांचे हस्तक मात्र येथे सक्रीय आहेत. गल्लीबोळात तसेच चौका-चौकात हे टोळके ग्रुपने थांबलेले दिसते. यामध्ये अनेक जण बेकार आहेत. मग यांच्याकडे महागड्या गाड्या फिरविण्यासाठी पेट्रोलसाठी पैसे कोठून येतात? हा संशोधनाचा विषय आहे.

महिलांमध्ये भीतीचे वातावरण
मुलांना शाळेत तसेच शिकवणीला सोडण्यासाठी महिला, मुली ये-जा करीत असतात. चौका-चौकात टवाळखोर ग्रुपने उभे असतात. पंचतारानगर चौक, संभाजीनगर चौक, पांढरकर वस्ती, मारुती मंदिर चौक तसेच म्हाळसाकांत चौक, गंगानगर बस स्टॉप या ठिकाणी टवाळखोर ग्रुपने थांबलेले दिसतात. एकमेकांना शिवीगाळ करणे, मोठ्याने बोलणे, महिलांकडे पाहून विचित्र हावभाव करणे, असे प्रकार सुरू असतात. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. टवाळखोरांच्या भीतीमुळे तक्रार देण्यास कोणी धजावत नाही. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी आहे.