आकुर्डी परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दणाणले!

0

पिंपरी- ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष, स्वागतासाठी मार्गात घातलेल्या रांगोळीच्या पायघड्या, तत्पर सेवा पुरविणा-या विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते… अशा उत्साही व भक्तीमय वातावरणात संत तुकाराम महाराजांचा पालखीने शनिवारी सकाळी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरातून पुण्याकडे प्रस्थान केले. पालखी सोहळ्यामुळे उद्योगनगरीत वैष्णवांचा मेळा अवतरल्याचे चित्र पहायला मिळाले.

आज, शनिवारी सकाळी पाच वाजता आकुर्डीतून पालखीचे प्रस्थान झाले. पालखीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. कपाळावर चंदन, गळ्यात तुळशीमाळ असलेले वारकरी, डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन निघालेल्या वारकरी महिला आणि मुखामध्ये हरिनामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात पालखी पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

निगडी ते आकुर्डी दरम्यानच्या मार्गात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. विठ्ठल मंदिराला आकर्षक पुष्पसजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिरासमोर साकारलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पालखीचे शहरात आगमन झाल्यामुळे निगडी गावठाण, प्राधिकरण, आकुर्डी, विठ्ठलवाडी या परिसराला वैष्णवांच्या मेळ्याचे स्वरुप आले होते. पालखी मार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शहरातील अनेक सेवाभावी संस्था व सामाजिक संघटनांच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान व वैद्यकीय सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला होता.

रस्त्यावर विविध सामाजिक संस्थाकडून वारकऱ्यांना न्याहारीचे वाटप करण्यात आले. दापोडी येथील सीएमईमधील कामगारांतर्फे वारकऱ्यांना नाश्ता व जेवण देण्यात आले. या कार्यक्रमासाठी अविनाश ठाकरे, विकास खंडागले, रितेश राजन, रवींद्र हादवे आदीनी परिश्रम घेतले. टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम लिमिटेड यांच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोट आणि खाद्यपदार्थचे वाटप करण्यात आले. संपत पारधी, उमेश मोहिते, संजय वाल्हे, प्रशांत गावडे, समीर ताडे, बापू मुजांळ, विकास जगताप, उदय भोसले, दादा पाटील, बालाजी वालमकले, दत्ता पाटील आदींनी सहभाग घेतला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने पालखीचे स्वागत केले. लायन्स क्‍लब ऑफ पिंपरी-चिंचवड, श्री सत्यसाई सेवा संघटना, वाल्हेकरवाडी डॉक्‍टर्स असोसिएशन व विश्‍व श्रीराम सेनेच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधांचे वाटप करण्यात आले. याशिवाय आकुर्डी व्यापारी मित्र मंडळ, लातूर जिल्हा मित्र मंडळ, विश्‍व श्रीराम सेना, गिरीजा हॉटेल यांच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले.

मोफत सेवा

महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सलमानी जमात वेल्फेअर असोसिएशन, व श्री संत सेना पालीखी सेवा सोहळ्याच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी मोफत दाढी व केस कापण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. अनेक वारकऱ्यांना ही सेवा पुरविली जात होती. याकरिता स्वतंत्र आठ खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभरात शेकडो वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला.

मुस्लिम बांधवांची पालखी सेवा

कासारवाडीत बिलार मस्जिद मुस्लिम बांधवानी वारकऱ्यांना पाणी वाटप केले. यावेळी फकरु भाई, अजगर आझाद, मुस्तफा आझाद सहभागी झाले होते.