आकुर्डी प्राधिकरणातील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या कामात ६० कोटीचा गैरव्यवहार

0

आकुर्डी प्राधिकरण : २०१३ मध्ये काढण्यात आली पहिली निवीदा

कामाची मुदत संपली; पालिकेचे अधिकारी – पदाधिकारी ठेकेदारांवर मेहेरबान

पिंपरी चिंचवड – आकुर्डी प्राधिकरणातील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे कामाची सन २०१३ मध्ये पहिली निविदा ३७ कोटी २५ लाखांची काढण्यात आली. या कामाचा कालावधी साडे चार वर्षाचा होता. निविदा प्रक्रिया राबवुन यासाठी एम. आर. गंगाणी ब्रदर्स या ठेकेदाराला काम दिले गेले. त्यानंतर कार्यारंभ आदेश ११ नोव्हेंबर २०१४ ला दिला. तरी काम पूर्ण झाले नाही. गेल्या चार वर्षापासून संथ गतीने काम सुरू आहे. काम वेळेत न करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी मेहरबान झाल्याचे दिसून येते. एका प्रकल्पावर आजवर पाच अभियंते नियुक्त केले गेले, मात्र काम वेळेत पुर्ण झाले नाही. या सर्व कामात मोठा गैरव्यवहार असून सुमारे ६० कोटी रुपये भ्रष्टाचार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

कारवाईकडे दुर्लक्ष…

नाट्यगृहातील मुख्य प्रेक्षागृहाची चार मजली इमारत चेंजिंग रूम व १२ कलाकारांसाठी राहण्यासाठी हॉटेल रूम आणि पाच हजार चौरस फूट आकारात रेस्टॉरंट, त्यांच्या पहिल्या मजल्यावर उद्योजक, शैक्षणिक वापरासाठी अडीचशे आसन क्षमतेचा हॉल आणि दुसऱ्या मजल्यावर २२० आसन क्षमतेचा छोटा हॉल असे नियोजन होते. त्यात इमारतीचे बांधकाम खोदाई, आरसीसी काम, फ्लेस्टोरचे कामाचा समावेश होता. या कामास १० नोव्हेंबर २०१७ पर्यंत मुदत होती. मात्र ठेकेदारांच्या संथ गती कामामुळे काम रेंगाळले आहे. महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई न करता वारंवार मुदतवाढ दिली. मुदत या महिना अखेरीस पूर्ण होत असतानाही प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी संबंधित आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ट अभियंता व स्थायी समिती सभापती व सदस्य हे या ठेकेदारावर मेहेरबान झाले आहे.

२२ कोटी ८९ लाख वाढीव खर्च…

यापूर्वी ३७ कोटी २५ लाखाचा खर्च मंजूर झाला असताना. या प्रकल्पाच्या उर्वरित फ्लोरिंग, सबस्टेशन रुम, पंप रुम, ध्वनिरोधक यंत्रणा, फॉल सिलिंग, रंग सफेदी, कॅट वॉक व इतर अनुषंगिक कामे होणार आहेत, त्यांचा आराखडा कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी तयार केला आहे. त्यात १४ कोटींचा स्थापत्यविषयक आणि आठ कोटींची विद्युतविषयक कामासाठी त्याच ठेकेदारास (एम. आर. गंगाणी ऍण्ड ब्रदर्स) र.रु. २२ कोटी ८९ लाख वाढीव खर्च महापालिकेच्या स्थायी समितीने व प्रशासनाने नुकताच मंजूर केले आहे.

कामाच्या रक्कमेपेक्षा अधिक खर्च…

सन २०१७ च्या अगोदर भाजप शिवसेना विरोधी पक्षात असताना अशा प्रकारच्या वाढीव खर्चाला कडाडून विरोध करत होते. सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीत आम्ही अशा वाढीव खर्चाला पायबंद घालून पारदर्शक काम करु असे अभिवचन दिले होते. असे असताना या प्रकल्पासाठी मुळ अंदाजीत खर्च र.रु. ३७ कोटी २५ लाख मंजूर केलेला असताना पुन्हा वाढीव खर्चाच्या नावाने याच ठेकेदाराला र.रु. २२ कोटी ८९ लाख खर्च मंजूर केला आहे. म्हणजे या ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या कामावर सुमारे ६० कोटी रक्कमेपैक्षा अधिक खर्च महापालिका करीत आहे. या खर्चात असे चार नाट्यगृहे शहरात उभारली गेली असते. या प्रकल्पाचे इस्टीमेट बनविताना संबंधित अभियंते मद्यधुंद अवस्थेत होते काय ? असा प्रश्न आमच्या पुढे पडतो.

गैरव्यवहारात सहभागी अधिकारी-पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा…

आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासोबत ठेवून शहरातील तीनही आमदारांनी प्रशासन व स्थायी समितीशी संगनमत करुन खर्च वसूल करण्यासाठी या प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला चालना दिली असल्याची दाट क्षक्यता आहे. त्यामुळे आकुर्डी प्राधिकरणातील र.रु.६० कोटीच्या ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या कामातील वाढीव खर्चाच्या नावाने केलेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचारात सामील असणाऱ्या आयुक्त, सभापती स्थायी समिती, सदस्य स्थायी समिती, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपभियंता, कनिष्ट अभियंता यांची राज्य गुन्हे अन्वेषन विभागामार्फत चौकशी करुन योग्य कठोर कार्यवाही करण्याची मागणी भापकर यांनी केली आहे.