आकुर्डी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू

0

पिंपरी-चिंचवड। श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान विठ्ठलवाडी, आकुर्डी यांच्या वतीने शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ षष्ठीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. 18 ते 26 मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे साडेचार ते साडेसहा या वेळेत काकडा आरती, सकाळी सात ते साडेअकरा दरम्यान गाथा पारायण, दुपारी चार ते साडेसहा नित्यनेम भजन व हरिपाठ तसेच रात्री पावणेआठ ते दहा या दरम्यान हरिकीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

21 मार्चला संत तुकाराम महाराजांचे वंशज श्री गुरु पुंडलिक महाराज मोरे देहुकर यांचे, 22 मार्चला संत एकनाथांचे वंशज योगीराज गोसावी महाराज, 23 मार्चला संत नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास यांचे कीर्तन होणार आहे. 25 मार्चला महंत महादेव महाराज बोर्‍हाडे शास्त्री यांचे हरिकीर्तन होणार असून सायंकाळी पाच ते सात दरम्यान ग्रामप्रदक्षिणा व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या महोत्सवाची सांगता 26 मार्चला होणार असून सायंकाळी सव्वापाच ते साडेसात या वेळेत काल्याचे कीर्तन व महाआरती होणार आहे. सायंकाळी आठ ते दहा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.