जळगाव । महावितरणाचे सोनवद कक्ष येथील अधिकारी धरणागांव तालुक्यातील झुरखेडा येथे विजबील वसूलीसाठी गेले असता त्यांना अनधिकृत टाकलेला तारेचा आकोडा दिसला. तो त्यांनी काढला असता एका दाम्पत्याने त्यांना शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी धरणगांव पोलीसात दाम्पत्याविरूध्द गुन्हा केले होता. यानंतर दाम्पत्य फरार झाले होते. त्यांना आज रविवारी धरणगांव पोलीसांनी मध्यप्रदेश राज्यातून ताब्यात घेतले आहे.
दोघांनी वाद घालून केली मारहाण
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे सोनवद कक्ष येथील अधिकारी 10 फेब्रुवारी रोजी धरणगांव येथील झुरखेडा येथे विजबील वसूलीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अविनाश पांडूरंग चौधरी याने अनधिकृतपणे महावितरण कंपनीच्या लघु वाहिणीवरून तारेचा आकोडा टाकल्याचे दिसले. यानंतर त्यांनी तारेचा आकोडा काढला. आकोडा काढल्याच्या कारणावरून अविनाश चौधरी व त्यांच्या पत्नी वंदना यांनी त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. यानंतर त्यांना मारहाण केली. याप्रकरणी सोनवद कक्ष अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीसात दोघांविरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. घटना घडल्याच्या दिवसापासून दोन्ही पती-पत्नी फरार होते.
पथकाने खंडवा येथून घेतले ताब्यात
याप्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर व अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दाखल घेवून संशयितांना अटक करण्याच्या धरणगांव पोलीसांना सुचना केल्या. यानंतर धरणगाव पोस्टेचे प्रभारी अधिकारी सपोनि. देविदास ढुमणे, पीएसआय सुकदेव भोरकडे, लालसिंग पाटील, मोती पवार, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, विद्या पाटील, वसंत कोळी यांच्या पथकाने दोन्ही पती-पत्नींचा जळगाव, औरंगाबाद येथे शोध घेतला परंतू दोघे मिळून आले नाही. मध्यप्रदेश राज्यातील खंडवा येथे दोघे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने खंडवा गाठून आज अविनाश चौधरी व वंदना चौधरी या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास सुकदेव भोरकडे करीत आहेत.