आक्रीतच घडले.. सत्ताधारीच रडले, आम्हाला विरोधक बोलूच देत नाहीत

0

मुंबई । विधान परिषदेतील बहुमताच्या जोरावर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदारांना बोलू देत नाही असा आरोप करत बुधवारी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधान परिषदेतून सभात्याग केला. विधान परिषदेतून सत्ताधार्‍यांनीच सभात्याग करण्याची राज्य विधीमंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उत्तर देता येत नसल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विधान परिषदेतून पळ काढावा लागला अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. बुधवारी प्रकाश मेहता, राधेश्याम मोपलवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी धारेवर धरल्याने सरकारची कोंडी झाली. शेवटी दुपारनंतर सत्ताधार्‍यांनी विधान परिषदेतून सभात्याग केला. ‘मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांना बोलू दिले जात नाही,’ असा रडीचा खेळ सत्ताधार्‍यांनी खेळला. मोपलवार, मेहता प्रकरणातून बचावासाठीच सत्ताधार्‍यांनी ही खेळी केल्याची चर्चा आहे.