इंद्रायणी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा मोर्चा
तळेगाव दाभाडे : प्राचार्यांच्या कथित आक्षेपार्ह वर्तनानंतर त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी इंद्रायणी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आज (सोमवार) मोर्चा काढला. प्राचार्यांच्या आक्षेपार्ह वर्तनाचे तीव्र पडसाद उमटताच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या विश्वस्त मंडळाने प्राचार्य डॉ. दत्तात्रेय बाळसराफ यांना निलंबित करून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितले. त्यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे, सीमा शुल्क विभाग उपायुक्त व माजी विद्यार्थी सुनील काशीद, सचिन पवार, बाळासाहेब धामणकर, नगरसेवक संतोष शिंदे, सुनील कारंडे, रोहित लांघे, महेश बेंजामिन, संदीप गराडे, सुनील पवार आदी उपस्थित होते. संतोष निंबळे, अनिकेत जाधव, सिद्धार्थ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक पालक सहभागी झाले होते.
प्राचार्यपदावरून केले निलंबित
प्राचार्य बाळसराफ यांचे वर्तन आणि कारभार मनमानी आणि संस्थेच्या प्रतिमेला काळीमा फासणारा असल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ मोर्चात जोरदार घोषणा देण्यात आल्या. महिला पोलीस निरीक्षक गावडे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाळसराफ यांच्या घरापासून ते महाविद्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले. प्राचार्यांच्या कृत्याबद्दल खंत व्यक्त करून काकडे म्हणाले की, हे महाविद्यालय प्रगतीची मोठी शिखरे गाठत असताना प्राचार्यांनी केलेल्या कृत्यामुळे गालबोट लागले आहे. बाळसराफ यांच्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांनी जे कृत्य केले त्याची गंभीर दखल नियामक मंडळाने घेतली असून 22 जून रोजी मंडळाच्या बैठकीत त्यांना प्राचार्य व संस्थेच्या विश्वस्तपदावरून निलंबित करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. दरम्यान, कथित खंडणी प्रकरणाची पोलिसांनी सखोल व सर्वांगीण चौकशी करून सत्य समाजापुढे आणावे, अशी मागणी राजेंद्र जांभूळकर यांनी मोर्चेकरांच्यावतीने केली.