राजगुरूनगर : आखरवाडी (ता. खेड) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जागतिक छायाचित्रण दिन व जागतिक विमान दिन संयुक्तपणे साजरा केला. जीवनातील नानाविध क्षणांना व प्रसंगांना अजरामर करण्यासाठी आपण छायाचित्रे काढतो. ही छायाचित्रण कला काल, आज आणि उद्यासुद्धा जीवनातील अविस्मरणीय अनुभव, घटना व प्रसंगांना अजरामर करण्यासाठी अशीच उपयुक्त ठरणार आहे. तिची आजच्या दिवशी आठवण करणे तर अगत्याचे आहेच; परंतु या कलेतील वेगवेगळे तंत्रज्ञान आत्मसात करून घेतल्यास अनेकांना आपल्या छंदासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत याप्रसंगी शिक्षकांनी मांडले.
कॅमेर्याची प्रतिकृती साकारली
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या दोन्ही महत्त्वपूर्ण वस्तुंनी सध्याचे आधुनिक युग व्यापून टाकलेले आहे. यांचे हे महत्व विशेषत्वाने अधोरेखित करीत आखरवाडी प्राथमिक शाळेमध्ये जागतिक विमान दिन साजरा करताना येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विमानाचा शोध लावणार्या राईट बंधुंचीही आठवण करून दिली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक कागदी विमाने तयार करून ती आकाशात उडवली. शाळेचे विज्ञानप्रेमी शिक्षक व मुख्याध्यापक संजय नाईकरे यांच्या संकल्पनेतून रांगोळीद्वारे छायाचित्रण करणार्या कॅमेर्याची प्रतिकृतीही साकारण्यात आली होती. याप्रसंगी सहशिक्षिका वर्षा राऊत व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.