आगरी-कोळी यूथ फाउंडेशनची सिडको अधिकार्‍यांसोबत बैठक

0

नेरुळ । आगरी-कोळी युथ फाउंडेशनची पूर्व नियोजित बैठक सिडकोच्या अतिरिक्त मुख्य नियोजनकार अपर्णा वेदुला यांच्या समवेत शुक्रवारी संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापलिका या तिन्हींच्या संयुक्त प्रयत्नाने विषय पुर्णत्वास जाणार असल्याने तिन्ही प्राधिकरणांकडे फाउंडेशनतर्फे सतत पाठपुरावा सुरु होता. पाठपुराव्याचा भाग म्हणून सर्व प्रथम व्यवस्थापकीय संचालकांकडून, सह व्यवस्थापकीय संचालक आणि त्यांच्याकडून विषयाच्या अंमलबजावणी करीता नियोजन विभागातील अतिरिक्त मुख्य नियोजनकारांकडे विषय पोहचला. त्यामुळे या विषयी फाउंडेशनचे मत जाणून घेण्याकरिता तसेच सर्वेक्षण प्रक्रियेत फाउंडेशन आणि ग्रामस्थांची भूमिका कशी असेल? सिडकोचे प्राथमिक नियोजन या आणि अशा संदर्भातील अनेक विषयांवर या बैठकीत आढावा घेण्यात आला.

दोन टप्प्यामध्ये काम सुरु करण्याचा मानस
पहिल्या टप्प्यात गावठाण हद्द निश्‍चिती ज्यात 1972 ची मूळ गावठाण निश्‍चिती आणि आता पर्यंतचे विस्तारित गावठाण हद्द निश्‍चिती आणि दुसर्‍या टप्प्यात मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाणाचे सर्वेक्षण असे दोन टप्प्यामध्ये काम सुरु करण्याचा मानस सिडकोकडून व्यक्त करण्यात आला. शासन दरबारी गरजेपोटी संदर्भातील धोरण लवकरच अपेक्षित असून तत्पूर्वी नवी मुंबईतील सर्व गावांच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न सिडकोचा असेल. असेही अतिरिक्त मुख्य नियोजनकारांद्वारे कळविण्यात आले. मात्र यापूर्वी सिडकोला ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सर्वेक्षणाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याची खंत सिडको कडून व्यक्त करण्यात आली. तर सर्वेक्षण नियमितीकरणासाठी असेल तर ग्रामस्थांचा सकारात्मक सहभाग जरूर लाभेल. असा विश्‍वास फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

14 मार्च 2017 ते 16 मार्च 2017 दरम्यान आगरी-कोळी युथ फाउंडेशनतर्फे पुकारलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनादरम्यान मंत्रालयातून भूमिपुत्रांची गरजेपोटी घरे नियमित करण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरु करण्याची लेखी हमी मिळाल्यावर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र फाउंडेशन करत असलेला पाठपुराव्याला हळूहळू यश येऊ लागले असून फाउंडेशन याही पुढे असाच पाठपुरावा सुरु ठेवेल.
– निलेश पाटील
अध्यक्ष-आगरी कोळी फाउंडेशन