कर आकारणी विभागातर्फे विशेष योजना
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे करदात्यांना दिलासा मिळावा यासाठी 2018-19 या आर्थिक वर्षातील मिळकतकराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या बिलांची रक्कम 30 जूनपर्यंत एक रकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सव्वा चार लाखांच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे करआकारणी केली जाते. तर थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलांची रक्कम 30 जून 2018 पर्यंत आगाऊ भरणार्या मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. यामध्ये माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी राहत असलेल्या मिळकतीस 50 टक्के, महिलांच्या नावे असलेल्या निवासी घरास 50 टक्के, 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणार्या अंध, अपंग, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावर असणार्या मिळकतीस 50 टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टिम राबविणार्या मिळकतीस 5 ते 15 टक्के, स्वतंत्र नोंद असलेल्या निवासी मिळकतीस 10 टक्के, तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनी यासाठी 5 टक्के सामान्यकरात सवलत दिली जाणार आहे.
ऑनलाईनसाठीही ऑफर
डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी 30 जून 2018 अखेर मिळकत कराचा ऑनलाईन भरणा केल्यास चालू वर्षाचे मागणीतील सामान्य करात 5% सवलत मिळणार. त्यापुढे 31 मार्च 2019 अखेर मिळकत कराचा ऑनलाईन भरणा केल्यास चालू वर्षाचे मागणीतील सामान्य करात 2% सवलत देय राहील. मिळकतधारकांना 16 करसंकलन विभागीय कार्यालय, महापालिकेची 8 क्षेत्रीय कार्यालये व महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पेमेंट गेट-वे द्वारे मिळकतकराचा भरणा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच रोख, धनादेश आणि डीडीद्वारे देखील कराचा भरणा करता येणार आहे. मिळकतधारकांनी 30 जून 2018 पर्यंत कराचा भरणा करून सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.