आगामी काळात भीमा कोरेगावसारखे प्रकार घडू शकतात!

0

कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

मुंबई : कोरेगाव भीमा घटना हिंसाचारामुळे पक्षापासून दूर चाललेल्या दलित समाजाला गोंजारत सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. दादर येथे मंगळवारी झालेल्या भाजप प्रदेश विशेष बैठकीत कार्यकर्त्यांना तशा खास सूचना देत दलित वस्त्या आणि मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरगाव हे मोठे षडयंत्र असल्याचे सांगत येणाऱ्या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे. लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. जातीय तेढ निर्माण झाल्यास भाजप कार्यकर्त्यांनी तिरंगा झेंड्या खाली सर्वाना सोबत आणावं. भाजप आणि सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी वर लक्ष द्यावे. लोकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा. निवडणुकीच्या तयारीला लागा, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

सरकारने आपली जबाबदारी नीट पार पाडली असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, भाजप आणि सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशावेळी सर्वांना तिरंग्याखाली एकत्र आणून, भाजप कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला. या बैठकीत भाजपकडून दलित समाजाविषयी सहानुभूती दाखवत भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप दलित समाजाला जवळ आणण्याबरोबर दलित नेत्यानांही गोंजारत आहे. प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीत नेहमी स्टेजखाली बसणाऱ्या राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना विशेष बैठकीत मुख्य व्यासपीठावर बसवण्यात आले होते.

संविधान बचावला तिरंगा रॅलीने उत्तर
विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला 26 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढून उत्तर दिले जाईल. राज्यात होत असलेली विकास कामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे त्यांना संविधानाची अचानक आठवण झाली आहे, असा टोला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मारला.

निवडणुकांच्या तयारीला लागा
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा, असे आवाहनही फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केले. गेल्या काही महिन्यांपासून 288 विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपचे पगारी विस्तारक बूथ पद्धतीने पक्षाची बांधणी करत आहेत. हे काम आता पूर्ण होत आले असल्याची माहिती आहे.