अक्कलकुवा । शिवसेना या पक्षात कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. त्याच बरोबर गोरगरीबांच्या न्याय हक्कांसाठी काम करणारा पक्ष असून आगामी काळात विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन मोलकी परिसरातील निंबीपारी (काठी) या ठिकाणी आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख जयप्रकाश परदेशी उपप्रमुख तापसिंग वसावे, पं.स.सदस्य रामसिंग वसावे आदी उपस्थित होते.
अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेश व आगामी काळात शिवसेना प्रत्येक गावागावात पोहचावी यासाठी मोलगी परिसरातील निंबीपाटी येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी सांगितले की, शिवसेना हा पक्ष गोरगरीब लोकांच्या सेवेसाठी असून स्थानिक आमदाराने आठ वर्षात केवळ एकच आमसभा घेतली ते येथील नागरिकांचे प्रश्न कधीही जाणून घेत नाहीत त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्य जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष भिका वसावे यांनी अनेक प्रमुख कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यात प्रामुख्याने काठीचे माजी सरपंच किसन वसावे, फत्या वसावे, रवींद्र वसावे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख जयप्रकाश परदेशी यांनी केले. यावेळी पं.स.सदस्य रामसिंग वसावे, रवींद्र वसावे, तापसिंग वसावे, शकुर मक्राणी यांनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन मोहन महाराज यांनी केले.