भाजपा-शिवसेनेच्या संयुक्त बैठकित निर्णय
जळगाव – राज्यात काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची राष्ट्रवादी किंवा काँग्रेससोबत आघाडी असली तरी आगामी काळात शिवसेनेला सत्तेत भागीदार करून घेण्याचा निर्णय आज झालेल्या भाजपा-शिवसेनेच्या संयुक्त बैठकित घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर अलिप्त राहण्याच्या भूमिकेवरून जिल्हा शिवसेनेने अखेर एक पाऊल मागे घेत भाजपसोबत जमवून घेतलंय. मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई आज पुन्हा एकदा यशस्वी झाली आहे.
ना. गिरीश महाजनांच्या जीएम फाऊंडेशन कार्यालयात भाजपा आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकिला जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, सभागृह नेते ललित कोल्हे आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत युती झालेली असताना जळगावात शिवसेना पदाधिकार्यांनी गतकाळात भाजपने दिलेल्या सापत्न वागणुकीचे कारण पुढे करत भाजपाचे काम न करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. मात्र इशार्याची ही तलवार आज शिवसेनेने म्यान केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी आज शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर केली. त्यामुळे सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आपण भाजपसोबत असल्याचं जाहीर केलं. सेना नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि सेनेतील मतभेद मिटल्याचं जाहीर केलं. महाजन म्हणाले की, काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निश्चित आमची
राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती आहे. नगरमध्ये आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेतलंय. परंतु, पुढच्या काळात आता आम्ही सेनेला सोबत घेणार असुन हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.