आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस गटाच्या विरोधात टक्कर देण्यासाठी शहरविकास आघाडीचे नेते हिरालाल काका चौधरी यांचे सुपुत्र तथा हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ, रवींद्र चौधरी यांनी भाजपचे कमळ हातात घेऊन रणशिंग फुंकण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे नगरपालिका निवडणुकीत मोठी चुरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून कोमजलेल्या भाजपाला ही ऊर्जा मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये होणार्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय हालचाली गतिमान झाल्या असून वातावरण निर्मितीला प्रारंभ करण्यात आला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कॉग्रेसला साथ देणारा शहर विकास आघाडीचा गट गेल्या दोन वर्षापासून दुरावलेला आहे. काँग्रेसचे नेते आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शब्द पाळला नाही,अशी खंत हिरालाल काका यांना आहे.
याशिवाय अन्य कारणावरून रघुवंशी गटावर ते नाराज आहेत. त्यामुळेच काकांनी आपले पुत्र शिरीष चौधरी यांना अमळनेर मतदार संघात आमदारकीच्या निवडणुकीत उभं करून अपक्ष निवडून आणलं. याचं सारं नियोजन डॉ. रवींद्र बापू चौधरी यांनी केलं होते. त्यांच्याच नियोजनातून अमळनेर मतदार संघात विविध प्रकल्प, उपक्रम राबविले गेले. आता नंदुरबारसाठी काही नवीन करण्याची इच्छा रवींद्र चौधरी यांची आहे म्हणून त्यांनी नगरपालिका निवडणूकिसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. भाजपाच्या मदतीने सत्ताधारी काँग्रेसचे आव्हान पेलण्यास ते सज्ज झाल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी खा. हिना गावित,पालकमंत्री जयकुमार रावल,आ. डॉ. विजयकुमार गावित, ओबीसींचे नेते विजय चौधरी यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या चर्चेनुसार रवींद्र चौधरी यांचा भाजपा प्रवेश रविवारी निश्चित झाला आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर नंदुरबारला आल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्याची तयारी समर्थकांनी केली आहे. रवींद्र चौधरी यांच्या भाजप प्रवेशामूळे निवडणूकित खर्या अर्थाने रंग भरला जाणार आहे. डॉ.गावित गट, भाजप, आणि शहरविकास आघाडी असे एकत्र येऊन काँग्रेस पुढे आव्हान उभं केलं जाणार असल्याचे राजकिय समीकरण जुळविले जात आहे. असे असले तरी सत्ताधारी काँग्रेसने देखील यासाठी तयारी पूर्ण केली असून निवडणुकीसाठी सहा महिने आधीच शंखनाद केला आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून केलेल्या विविध विकास कामांचा आरसा जनतेसमोर ठेऊन मत परिवर्तन करण्यावर आघाडी घेतली आहे. आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी तर कामांचा लेखाजोखा मांडून अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपा आता कोणता मुद्दा घेऊन काँग्रेसला टार्गेट करते ,तसेच नगराध्यक्षपदाचे भावी उमेदवार डॉ. रविंद्र चौधरी हे या दीड महिन्यात लोकांपर्यंत कोणत्या माध्यमातून पोहचतात यावरच हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
-रवींद्र चव्हाण, नंदुरबार
9423194841