आगामी निवडणुकांत सेनेचा एकला चलो रेचा नारा!

0

विधानसभा, लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार

मुंबई : भाजपला सत्तेत राहून नेहमी बाहेर पडण्याचे इशारे देणाऱ्या शिवसेनेने आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एकला चलो रे चा नारा दिला आहे. भाजपसोबतचे संबंध पराकोटीचे ताणले गेल्याने शिवसेनेने २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव मंगळवारी झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घोषणेबरोबरच शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकीचे रणशिंगही देखील फुंकले आहे.

वरळी येथील एनएसआयसीच्या पटांगणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. ४ डिसेंबर, २०१७ रोजी ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा वृत्तांत प्रतिनिधी सभेसमोर मांडण्यात आला. सदर बैठकीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव मांडला. त्याला कार्यकारिणीने तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपच्या विरोधात रान उठवणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.