आगामी निवडणुकांमध्ये बदल घडणारच!

0

लांडे यांचा विश्‍वास : सत्ताधार्‍यांच्या निष्क्रियतेमुळे शहराची स्थिती विदारक झाल्याचा आरोप

पिंपरी चिंचवड : गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेने सत्ताबदल करून मोठ्या विश्‍वासाने देशाची आणि राज्याची सत्ता भाजपाच्या ताब्यात दिली. मात्र, गेल्या चार वर्षात युती सरकारने जनतेची घोर निराशाच केली आहे. एकहाती सत्तेचा मनमानी वापर करून जनतेला वेठीस धरण्याचे घाणेरडे राजकारण भाजपाने केले. त्यामुळे 2019 च्या निवडणुकांमध्ये बदल नक्की घडणार, असा विश्‍वास माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या नियोजनानिमित्त शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे,प्रशांत शितोळे, युवक राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष विशाल वाकडकर, विरोधी पक्षनेते दत्ता काका साने,निलेश पांढरकर व इतरही पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

विलास लांडे म्हणाले, ‘भाजपाला आपला विजय पचवता आलेला नाही. विकासाचे गाजर दाखवून त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. जनतेला छळायची एकही संधी ते सोडत नाहीत. जीएसटी, नोटाबंदी, इंधन दरवाढ असे जनविरोधी निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केंद्रात एकहाती सत्ता मिळविल्यानंतर सत्तेचा अमल चढलेल्या भाजपा सरकारने पहिल्यापासूनच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम केले आहे. राज्याच्या राजकारणातही तोच प्रकार सुरू आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळ मांडला जात आहे. सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर वेगवेगळ्या नियमांची चाळण लावून शेतकर्‍यांचा आकडा कमी करण्याचा डाव खेळला गेला आहे.’

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतही भाजपाची सत्ता आहे. मात्र, शहरविकास आणि सुरक्षितता याबाबत शहराची अवस्था फारच दयनीय झालेली आहे. गेली चार वर्षे सत्तेत असूनही भाजपा अद्याप विकासाचा सूर गवसला नाही, अशी खरमरीत टीका लांडे यांनी यावेळी केली.

शहरवासीय दहशतीच्या सावटाखाली
वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराची परिस्थिती अत्यंत विदारक बनली आहे. दहशतीच्या वातावरणामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेणेही मुश्किल झाले आहे. मात्र, भीतीपोटी कुठेही वाच्यता न करता शहरातील जनता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. सत्तेत असणारे काहीजण गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत, असा आरोप लांडे यांनी केला.

शास्तीकराबाबत जनतेची दिशाभूल
शास्ती कर माफ केल्याची आवई सत्ताधार्‍यांनी उठवली खरी; पण त्याचा प्रत्यक्ष लाभ अद्याप जनतेला झालेला नाही. उलट अजूनही शास्तीकर वसूल होत आहे. शास्तीकराबाबतचा शासन निर्णय (जीआर) अजून आमच्याकडे आला नाही, त्यामुळे काहीच निर्णय घेऊ शकत नाही, असे म्हणून महापालिका प्रशासन आता हात झटकत आहे. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी सत्ताधारी मंडळी जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोपही लांडे यांनी केला आहे.

महापालिका आयुक्त गोट्या खेळतायत का?
हल्ली स्थायी समितीत कोणतेही ठराव मंजूर होत आहेत. जनविरोधी निर्णय घेऊन लोकांच्या माथी मारले जात आहेत. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. जनतेचा आक्रोश महापालिका प्रशासनाला ऐकू येत नाही. आयुक्त नेमके काय काम करतात? गोट्या खेळतात का ते? असा संतप्त सवाल लांडे यांनी उपस्थित केला.

अनधिकृत टपर्‍या का वाढतायत?
शहरातील रस्ते अत्यंत चांगले आहेत. पण आता कशालाही न जुमानता रस्त्याकडेला टपर्‍या उभ्या करण्याचे काम सुरू आहे. अनधिकृत टपर्‍यांमुळे गुन्हेगारी वाढत आहे. राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळेच टपर्‍यांचे पीक फोफावत चालले आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असेही लांडे यावेळी म्हणाले.

हे तर श्रेय लाटण्याचे काम
पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालय व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केले. तसा ठराव आम्ही केला. त्याला आता यश येत आहे. मात्र, हे काम आम्हीच कसे केले असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या सत्ताधारी करत आहेत. दुसर्‍याचे श्रेय लाटण्याचे काम बंद करावे, असा टोला विलास लांडे यांनी भाजपाला लगावला.