पुणे : आजपर्यंत ‘मी जिथे जिथे गेलो आहे तिथे तिथे भाजपचा पराभव झाला आहे, हा इतिहास आहे. सध्या मी महाराष्ट्रात आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला नक्की पराभवाला सामोरे जावे लागेल असा विश्वास भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यात व्यक्त केला.
पुण्यात त्यांनी समता भूमीला भेट दिल्यावर माध्यमांशी संवाद साधला. सध्या देशात आंबेडकरवादी आणि बहुजनांचा आवाज चेपला जात आहे. मी नेता नसून कार्यकर्ता आहे. आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले यांना सभा घेण्यास परवानगी दिली असेल तर मला का नाकारली जात आहे याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. मी निवडणुकीचे राजकारण करणार नाही मात्र डॉ.आंबेडकर, कांशीराम यांचे राजकारण करणार असेही त्यांनी सांगितले.