भुसावळात माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन ; सत्तेत राहून पक्षावर टिका करणार्या शिवसेनेचे टोचले कान
भुसावळ- भाजपात अनेक चांगले लोक आले अन् मंत्रीही झाले याबाबत मला बोलायचे नाही कारण तुम्ही सुज्ञ आहात, अशी मार्मिक टिका माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे करीत राज्यातील सेना-भाजपाची युती तोडण्याचा निर्णय आपला नव्हे तर तो पक्षाचा होता, केवळ आपण हा निर्णय सांगण्याची भूमिका निभावली, असे स्पष्ट मत येथे व्यक्त केले. शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात भाजपा बुथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांची शुक्रवारी सकाळी कार्यशाळा झाली. याप्रसंगी ते बोलत होते. सत्तेतच राहून भाजपावर टिका करणार्या शिवसेनेचा त्यांनी समाचार घेत हे वागणे चांगले नसल्याचे सांगत शासनाचे काही निर्णय चुकले असतील त्यासाठी मंत्री मंडळाच्या कॅबिनेट बैठकीत बोलावे, जाहीररीत्या जनतेपर्यंत बोलणे चुकीचे असल्याचा ज्येष्ठत्वाचा सल्लाही त्यांनी दिला. आगामी निवडणुकीत भाजपाचेच सरकार येणार असल्याचा त्यांनी दावा करीत विकासकामे आपण मंजूर करतो मात्र त्याचे श्रेय विरोधक घेतात याचा अर्थ आपण श्रेय घेण्यात कुठेतरी कमी पडत असल्याची कबुली त्यांनी दिली.
70 वर्षात विकासकामे न झाल्याने भाजपाचे सरकार
काँग्रेस राजवटीत भ्रष्टाचार बोकाळला, देश विकासात मागे पडला, हिंदू-मुस्लीम दंगलीमुळे समाजात वितुष्ट आले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केंद्रासह राज्यात भाजपाचे सरकार आले. गेल्या साडेचार वर्षात पक्षाने अनेक विकासकामे केली असून ती जनतेपर्यंत पोहोचण्याची जवाबदारी आता आपल्यावर आहे. साकेगावसह खडका पाणी योजनेचे श्रेय विरोधक घेतात याचा अर्थ आपण कुठेतरी सांगण्यास कमी पडलो, असा त्याचा अर्थ होतो. सरकारला कुणी सांगितले? पाठपुरावा कुणी केला ? हे आपण केले आता जनतेपर्यंत जावून सांगण्याची गरज आहे. आमदार-खासदारांनी केलेली विकासकामे सांगायची ाहेत. मतदारांच्या मनावर वारंवार हे बिंबवल्यानंतर तो साहजिकच भाजपालाच मी मतदान करेल, असे तुम्हाला सांगेल, असा विश्वासही खडसेंनी व्यक्त केला.
निवडणुका आल्या की राजकीय स्थिती बदलते
निवडणुका आल्या की राजकीय स्थिती बदलते, विरोधक अधिक आक्रमक होतात हे स्वाभाविक आहे. मी विरोधी पक्षनेता असताना सरळ मुख्यमंत्र्यांवर घाला घालून कागद दाखवून नालायक, बेअकली असे शब्द प्रयोग करायचो मात्र आजपर्यंत या शब्दांसाठी कधी माफी मागितली नाही कारण मी पुराव्यानिशी बोलायचो. सध्या राजकारणात कन्व्हेन्स झाले नाही तर कन्फ्यूज करण्याचे प्रकार सुरू आहेत त्यामुळे आपण त्याबाबत सावध रहायला हवे, असेही खडसे म्हणाले. गेल्या 70 वर्षांत काँग्रेसने जे केले नाही ते भाजपा सरकारने केले आहे.
तर भाजपाचे येऊ शकते स्वबळावर सरकार
भाजपाची सत्ता नसताना स्व.गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार आदींसह आपण रान उठवून एकट्याच्या बळावर 122 जागा त्यावेळी आणल्या होत्या व आता तर भाजपाचे सरकार आहे. मग 150 जागा निवडून येणार नाहीत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कार्यकर्ता जोमाने कामाला लागत नाही तोपर्यंत पक्षाला यश नाही, असे खडसे यांनी सांगत भाजपाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा, जनतेसाठी आणलेल्या 42 योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी करीत सार्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील, असा माणुस जन्माला यायचा आहे त्यामुळे आहे त्यात समाधान मानून काम करा, असे सांगून खडसेंनी कार्यकर्त्यांना बळ दिले. नगरसेक युवराज लोणारी, पिंटू ठाकूर यांचा उपक्रमशील नगरसेवक असा गौरव करीत त्यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.
नाथाभाऊ मंत्री का नाही ? हे विचारू नका !
भाजपाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा, आगामी निवडणुकीत विजय भाजपाचाच आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भाषणानंतर खडसेंनी कार्यकर्त्यांना जे विचारायचे आहे ते विचारा मात्र नाथाभाऊ मंत्री का झाले नाही? हे विचारू नका, अशी मार्मिक टिपणी केल्याने हास्याचे फवारेही उडाले. आगामी काही दिवसांनी मंत्री मंडळाचा विस्तार असून त्यात खडसेंना स्थान मिळते वा नाही? याबाबत तर्क-वितर्क आहेत त्यामुळे खडसेंनी केलेल्या टिपणीत अनेक अर्थ दडल्याचे राजकीय समीक्षकांना वाटते.
व्यासपीठावर यांची उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, गटनेता मुन्ना तेली, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, नगरसेवक युवराज लोणारी, पुरूषोत्तम नारखेडे, रमाशंकर दुबे, प्रशांत निकम आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा.सुनील नेवे तर सूत्रसंचालन प्रशांत निकम यांनी केले.