पिंपरी :- २०१९ च्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी “राष्ट्रवादी’ने कंबर कसण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर भर द्यावा लागणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी चिंचवड येथे सांगितले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आज राष्ट्रवादी युवक, बुथ आढावा बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी नवीन पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
…तर राष्ट्रवादी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष
कोते-पाटील म्हणाले की, जो कार्यकर्ता पक्षासाठी काम करेल, पक्षाला वेळ देईल अशा कार्यकर्त्यांनाच यापुढे संधी दिली जाईल. भूलथापांना भुलल्यामुळेच सर्वसामान्य जनतेला आज बुरे दिन आले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच मोदी सरकारला आज चार वर्षे पूर्ण झाली तरीसुद्धा देशातील महागाई कमी झाली नसून सरकार महागाई कमी करण्यात अपय़शी ठरली आहे. भाजप सरकार विरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे. राज्यभरात युवकांची ताकद उभी राहिली तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून होऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यभरात विविध विषयांच्या संदर्भात आक्रमक आदोलने, मोर्चे काढले आहेत. युवक राष्ट्रवादीच्या नवीन शाखा स्थापन केल्या. जिल्हास्तरीय मेळावे घेतले. आगामी महिन्यांत बूथनिहाय मोहीम युवकांनी राबवायची आहे. सक्रिय युवक कार्यकर्त्यांची मजबूत फळी बांधण्यात येणार असून त्याची जबाबदारी संग्राम कोते पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, प्रवक्ते फजल शेख, उपाध्यक्ष विशाल काळभोर, लाला चिंचवडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.