आगामी वर्ल्डकपमधून पाकिस्तान होणार आऊट?

0

दुबई : पाकिस्तानला 2019 च्या आंतरराष्ट्रीय विश्वचषकासाठी थेट पात्र होणे अत्यंत अडचणीचे ठरणार आहे. संघाची सततची खराब कामगिरी यामागचे कारण आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीमध्ये पाकिस्तानची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. आयसीसीच्या आकडेवारीनुसार पाकिस्तान सध्या 89 गुणांसह दोन अंकांनी बांगलादेशच्या मागे आहे, तर दोन अंकांनी वेस्ट इंडिजच्या पुढे आहे. यजमान इंग्लंडशिवाय 30 सप्टेंबर 2017 पर्यंत आयसीसीच्या वन डे क्रमवारीतील टॉप 7 संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील. पाकिस्तान संघ विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी गुणांची कमाई करण्यास अपयशी ठरला आहे. शिवाय संघाच्या क्रमवारीतही काही खास बदल झालेले नाहीत, असे आयसीसीने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव
पाकिस्तान फेब्रुवारीमध्ये संयुक्त अरब अमीरातमध्ये (यूएई) बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी, तीन वन डे आणि एक टी-ट्वेंटी सामना खेळणार आहे. त्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये पाकिस्तान वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. तिथे पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन वन डे आणि दोन टी-ट्वेंटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना करायचा आहे. पाकिस्तानला नुकत्याच खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-4 असा दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे येत्या काळात बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवणे पाकिस्तानला गरजेचे आहे.

भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका मजबूत
विश्वचषकासाठी थेट पात्र होण्यासाठी ऑस्ट्रेलिया, टीम इंडिया आणि आफ्रिका जवळपास निश्चित झाले आहेत. तर इंग्लंड यजमान असल्याने त्यांचा प्रवेश निश्चित आहे. सध्या 112 गुणांसह आयसीसीच्या वन डे क्रमवारीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका देखील जवळपास निश्चित मानले जात आहेत. ऑस्ट्रेलिया 120 गुणांसह पहिल्या आणि दक्षिण आफ्रिका 116 गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर पाकिस्तानची स्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. पाकिस्तानच्या संघाचा दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मानहानीकारक पराभवाचे दु:ख असतानाच आता आगामी विश्वचषक स्पर्धेतून बाद होण्याची टांगती तलवार पाकच्या संघावर आली आहे.

खूप कष्ट घ्यावे लागणार
गेल्या काही सामन्यांमधील निराशाजनक कामगिरीमुळे पाक संघ २०१९ साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नुकत्याच आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार पाकिस्तानच्या संघाला संघ क्रमवारीत आठवे स्थान मिळाले आहे. आयसीसीच्या नियमांनुसार विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होत असलेला यजमान देश आणि क्रमवारीतील पहिले सात संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतात. पण पाकिस्तानचा संघ आठव्या स्थानावर असल्यामुळे संघाला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता फेरीतून आपली योग्यता करावी लागण्याची शक्यता आहे. अर्थात पाकिस्तानकडे आपली क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी आहे. पण तोवर पाकिस्तानने पहिल्या सात संघांमध्ये आपले स्थान प्राप्त केले नाही, तर संघाला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत.