आगामी विश्वचषकापर्यंत खेळणार धोनी

0

लंडन । सध्याच्या घडीला महेंद्रसिंग धोनीसारखा खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर दुसरा कोणीच नाही, असे न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने म्हटले आहे. धोनीच्या क्षमतेचे कौतुक करत धोनी ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे त्याने सांगितले. आगामी विश्वचषक 2019 ला होणार असून वयाच्या वयाच्या 38 व्या वर्षी धोनी संघात स्थान मिळवू शकेल, असे फ्लेमिंगने म्हटले आहे.

फ्लेमिंग म्हणाला की, धोनीने वैयक्तिक आयुष्य आणि क्रिकेट यामध्ये चांगले संतुलन राखले आहे. याचा त्याला निश्चित फायदा होईल. संघात स्थान कायम राखायचे असेल तर चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे लागेल, हे धोनीला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच आगामी विश्वचषक स्पर्धेत धोनी खेळेल, असा विश्वास फ्लेमिंगने व्यक्त केला. धोनीची सध्याच्या घडीला मैदानातील चपळाई पाहता फ्लेमिंगची भविष्यवाणी खरी ठरण्याची संकेत मिळतात. यासोबतच आता आगामी चॅम्पियन्स कंरडक स्पर्धेत धोनीच्या कामगिरीकडे लक्ष असेल. महेंद्र सिंग धोनीने भारतीय संघासाठी दिलेले योगदान हे अविस्मरणीय असल्याचे फ्लेमिंग म्हणाला. गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. अनेकदा खुद्द धोनीला निवृत्त कधी होणार यासंदर्भात विचारणा देखील झाली. त्यानंतर धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली. एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधारपदाला त्याने अलविदा केले. कसोटीमधून निवृत्ती स्वीकारुन धोनी 2019 च्या विश्वचषकात खेळण्याची तयारी करत असल्याच्या चर्चाही रंगल्या. त्यानंतर आता फ्लेमिंगने धोनी विश्वचषक खेळण्यास सक्षम असल्याचे म्हटले.