आगाशी पोलीस ठाणे स्थलांतरित

0

विरार : गेल्याच आठवड्यात आगाशी येथील पोलिस ठाण्याचे अर्नाळा समुद्र किनारा येथे स्थलांतर केले. त्यामुळे बोळींज, ओलांडा तसेच गोकूळ टाऊनशीप परिसरातील नागरिकांना सात किलोमीटर अंतरावरील अर्नाळा पोलिस ठाण्यात संबंधित कामासाठी जावे लागत आहे. बोळींज विभागातील सोयीस्कर अश्या पर्यायी जागी पोलीस बिट कायमस्वरूपी असावे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही अशी मागणी नागरिकांकडून व लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली आहे. आगाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नारंगी, नवीन विवा कॉलेज, गोकुळ टाऊनशीप, खारोडी, बोळींज, करमाळे, सत्पाळा, वटार, नवापुर, उंबरगोठण हा परिसर आहे. यासाठी या परिसरात नव्याने पोलिस चौकी सुरू करण्यात यावी यासाठी अर्नाळा-आगाशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक के. डी. कोल्हे यांना निवेदन देण्यात आले.

नवीन आऊटपोस्ट बनविण्याचे आश्वासन
तालूक्यातील वाढती लोकसंख्या व सोबत गुन्हेगारीचा वाढत चाललेला चढता आलेख लक्षात घेता बोळींज परिसरात पोलिस चौकी गरजेची आहे. जेणेकरून गुन्ह्यांवर अंकूश ठेवण्यात मदत होणार आहे. याबाबत पोलिस निरिक्षक के.डी. कोल्हे यांनी आगाशी-अर्नाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन नवीन आऊटपोस्ट बनविण्यात येणार असल्याचे सांगितले. बोळींज येथे नव्याने पोलिस स्टेशन संबंधी प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आगाशी पोलिस पाटील तुषार पाटील, मनोहर महाडिक, संजय ठाकूर उपस्थित होते.