पुणे : येरवडा व विश्रांतवाडी परिसरात मंगळवारी लागलेल्या आगीत 12 झोपड्या जळून खाक झाल्या. येरवड्यातील लक्ष्मीनगर झोपडपट्टीमध्ये तीन सिलेंडरचा स्फोट झाल्याने सहा झोपड्यांना आग लागली. विश्रांतवाडी येथील भारतनगरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सहा झोपड्या जळून खाक झाल्या.
येरवडा परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये अगदी दाट वस्तीची घरे आहेत. मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास अचानक एका घरातून धूर येत असल्याचे नागरिकांनी पाहिले. आतमधून आगीचा भडका उडाला. त्यानंतर घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे शेजारील दोन्ही बाजूच्या घरांना आग लागली. काही वेळातच दुसर्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यापाठोपाठ तिसरा सिलेंडरने पेट घेतला. आगीपासून बचावासाठी नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे जीवित हानी झाली नाही. आगीत झोपड्या मात्र जळून खाक झाल्या. भवानी पेठ, नायडू, पाषाण व येरवडा अग्निशामक दलाचे चार बंब आणि एक पाण्याच्या टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक केंद्रप्रमुख समीर शेख, प्रमोद सोनवणे, जवान विष्णू जाधव, पाटोळे, संजय जाधव, करीम खान व इतर जवानांनी आगीवर अर्ध्या तासानंतर नियत्रंण मिळवले. विश्रांतवाडी परिसरातील भारतनगरमध्ये असणार्या टँक रोडवर दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक सहा झोपड्यांना आग लागली. येरवडा, कॅन्टोमेंन्ट अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्धा ते पाऊण तासात आगीवर नियत्रंण मिळवले.