मनोर । तारापूर औद्योगिक वसाहतीत ई झोनमधील एका कंपनीत गुरुवारी रात्री रिअॅक्टर, बॉयलर तसेच सोल्व्हेन्ट टाकीत 18 स्फोट झाले. हा स्फोट इतका मोठा होता की या स्फोटाचे हादरे तब्बल 30-35 किलोमीटरपर्यंत जाणवले. रात्री 11.28 वा. पहिला स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरातील घरांच्या भिंती, दरवाजे, पत्रे हादरले, त्यामुळे भूकंप झाल्याचं वाटून अनेकजण घराबाहेर पडले. त्यानंतर लागोपाठ अन्य स्फोट झाले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या अधिकारी तसेच पोलिसांनी पाहणी केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
बोईसर औद्योगिक वसाहतीमधील नोव्हाफेन स्पेशालिटी या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंटूकुमार गौतम, जानू आदारिया आणि अलोक नाथ अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे बोईसर भोपाळ दुर्घटनेच्या दिशेने जात असल्याची भीती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बोईसर उद्योगनगरीत रात्रीच्या सुमारास घातक वायू सोडले जात असल्याची चिंता सतावत असतानाच ही घटना घडल्यामुळे बोईसरमध्ये राहणे जोखमीचे ठरले आहे. इ 107 क्रमांकाच्या प्लॉटवरील या रासायनिक कारखान्यात रिअॅक्टर, बॉयलर व सॉल्व्हन्ट टाकीत एकापाठोपाठ 18 स्फोट झाले. या स्फोटांची तीव्रता इतकी होती की यामुळे संपूर्ण बोईसर शहर हादरले.
लोकांना भूकंप झाल्यासारखे वाटले व तशा अफवा देखील पसरल्या. लोक घराबाहेर पडले. सोशल मीडियावरून वार्याच्या वेगाने या बातम्या पसरल्या. पहाटे 2 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने याबाबत प्रेस नोट काढल्यानंतर लोकांना नेमके काय झाले हे अधिकृतरीत्या समजले. या दुर्घटनाग्रस्त नोव्हाफेन स्पेशालिटीच्या बाजूला असलेल्या आरती ड्रग्ज कंपनीत आगीत होरपळून 3 कामगारांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. 12 जखमींवर उपचार सुरू असून त्यातील एक जणांची प्रकृती गंभीर आहे. नोव्हाफेन स्पेशालिटीमधील 7 जखमी कामगारांवर उपचार केले जात असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.असे असले तरी लोकांना या आकडेवारीवर विश्वास नाही. अपघात घडला त्यावेळी कारखान्यात किती कामगार होते? व ते सुरक्षितपणे घरी पोहोचले किंवा नाही, हे तपासल्यानंतरच याबाबत खरे काय ते स्पष्ट होणार आहे. कारखान्यात स्फोट झाल्यानंतर आग लागली. स्फोटाच्या तीव्रतेमुळे आगीचे लोण आजूबाजूच्या आरती ड्रग्ज, युनिमॅक्स, प्राची, भारत रसायन आणि दरबार या कारखान्यात पसरले. ही आग लांबलांबवरच्या इमारतींमधूनदेखील दिसत होती. अपघातात मोठी वित्तहानी झालेली असली तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नसल्याचे शासकीय यंत्रणांकडून सांगण्यात येते. दरम्यान अग्निशमन यंत्रणा त्वरित घटनास्थळी पोहोचली व आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. कारखाना संपूर्णपणे जाळून खाक झाल्यानंतरच अथक प्रयत्नानंतर आता आग नियंत्रणात आली असली तरी अजून काही भागांत आग धुमसत आहे.
एमआयडीसीत अॅसिडची गळती
तारापूर एमआयडीसीमधील एका रासायनिक कारखान्यामधील टँकमधून हायड्रोक्लोरिक अॅसिडची (एचसीएल) गळती होऊन ते कारखान्यामध्ये व कारखान्याबाहेरील रस्त्यावर पसरून त्या अॅसिडमधून निघालेल्या धूर आणि वायूमुळे अनेकांना त्रास झाला. मात्र, तारापूर अग्निशमन दलाने घटनास्थळी त्वरित दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यावेळी पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.एमआयडीसीतील फ्लॉट न. एन 78 मधील पंचामृत केमिकल्स प्रा.लि मध्ये मंगळवारी संध्याकाळी मेटोलोनिक अॅसिडचे उत्पादन सुरू असताना 15 हजार क्षमतेच्या एका मोठ्या टाकीमध्ये असलेले सुमारे 8 हजार लिटर हायड्रोक्लोरिक अॅसिड(एचसीएल) पैकी सुमारे 2 हजार लीटर इतके अॅसिड गळती होऊन ते कारखान्याच्या आवारात व बाहेरील रस्त्यावर पसरले ही गळती टाकीच्या क्रॅक झालेल्या व्हॉल्वमधून झाली होती.