राज्य अग्निशमन संचलनालयाचेचे महापालिकेला आदेश
पिंपरी : आपल्या कार्यकक्षेतील एका शाळेत आगीपासून बचाव करता येऊ शकेल अशा विद्यार्थी, शिक्षक व पालक संघाच्या पदाधिकार्यांचा समावेश असलेल्या शालेय अग्निशमन व्यवस्थापन समितीसह विविध स्तरांवरील एकूण दहा समित्या स्थापना करण्याचे निर्देश महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचलानलयाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय येत्या रविवारी (दि. 21) आगीपासून बचाव करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या समित्यांत शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकांमधून महिला व पुरुष असे प्रत्येकी एक प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचे दोन प्रतिनिधी तसेच पालक संघाचे दोन प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. तसेच, बचाव व सुटका समितीमध्ये शाळेतील एनसीसी किंवा स्काऊट गाईडमधील दोन विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. याशिवाय, जनजागृती समिती, अवलोकन समिती, प्रथमोपचार समिती, वाहतूक व्यवस्थापन समिती व प्रसारमाध्यम समिती अशा एकूण दहा समितीची सदस्य संख्या व त्यांचे निकष ठरवून देण्यात आले आहेत.
मुंबईतील घटनेनंतर राज्य सरकारला जाग
काही दिवसांपूर्वी मुंबईतील लोअर परळ भागातील कमला मिल कम्पाऊंड येथील एका हॉटेलला आग लागली होती. लागलेल्या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून, त्यात 15 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारच्या अग्निशमन सेवा संचालनालयाशी पत्रव्यवहार करुन आगीपासून बचावाच्या उपाययोजना करण्याविषयी जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. आगीसारखी एखादी दुर्घटना घडल्यास, प्रसंगावधान दाखवून स्वत:सह इतरांचा जीव वाचविण्यासाठी देशातील सर्व नागरिकांना आगीपासून बचाव करण्याच्या उपाययोजना माहिती असाव्यात, याकरिता देशपातळीवर अग्निशमन व बचावाची कवायत व प्रात्यक्षिके हाती घेण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत असलेले अग्निशमन सेवा, नागरी सुरक्षा व गृहरक्षक दल महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी दिले आहेत. याकरिता स्थानिक पोलिस, नागरी संरक्षण स्वयंसेवक व वैद्यकीय विभागाची मदत घेण्याचे सूचित केले आहे.
विद्यार्थी, शिक्षकांना शास्त्रोक्त माहिती देणार!
या आदेशानुसार आपल्या कार्यकक्षेतील एका शाळेत आगीपासून कशाप्रकारे बचाव करता येऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्याचे आदेश आहेत. याकरिता शाळेत विविध स्तरांवरील एकूण दहा अग्निशमन समित्या स्थापन करुन, प्रत्येक सदस्याला आगीपासून बचाव करण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जावे. या प्रात्यक्षिकांकरिता अग्निशमन दलाचे सहा ते आठ जवानांची टिम तयार करुन, त्यावर देखरेखीसाठी पर्यवेक्षक नेमले जावेत. शाळा व्यवस्थापनाच्या संपर्कात राहून, ठराविक कालावधीनंतर या सर्व सदस्यांची आपल्या कामाची उजळणी घेतली जाणार आहे. याशिवाय आपल्या कार्यकक्षेतील नेमक्या कोणत्या शाळेत हे प्रात्यक्षिक आयोजित केले होते, याची माहिती अग्निशमन सेवा संचालनालयाला पाठविली जाणार आहे. राज्यातील सर्व माहिती एकत्रित करुन, तिचा एकत्रित अहवाल या संचालनालयाकडून केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविला जाणार आहे.