आग्रही भूमिकेमुळे कुंबळेवर चाप?

0

नवी दिल्ली । भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना मुदतवाढ देणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अचानक गुरुवारी स्पष्ट केले. कुंबळे यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कालावधी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या करारामध्ये बीसीसीआयने वाढ करावी तसेच खेळाडूंच्या मानधनात 150 पट वाढ करावी अशी भूमिका कुंबळेने घेत बीसीसीआयच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप केला असल्याचा राग तर कुंबळेवर काढला जात नाही ना? असा सवाल क्रिकेटप्रेमी उपस्थित करत आहेत. कुंबळेच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने मायदेशात 13 कसोटी सामने खेळले, यापैकी 10 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला होता. या 13 कसोटी सामन्यांमध्ये भारताला फक्त एकाच सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने वेस्ट इंडिजमध्येही कसोटी मालिका जिंकली होती. कुंबळेने पदभार सांभाळल्यापासून संघाच्या कामगिरीत अमुलाग्र बदल झाला आहे.

झहीर होणार गोलंदाजी प्रशिक्षक?
उत्तम गोलंदाज म्हणून खेळलेले कुंबळे संघासोबत गोलंदाजी प्रशिक्षक असावेत यासाठी आग्रही आहेत. झहीरच्या नियुक्तीचा प्रस्ताव कार्यकारिणीत चर्चेत आल्यानंतरच निर्णय होऊ शकेल. गतवर्षीही झहीरला हा प्रस्ताव देण्यात आला होता; पण त्या वेळी काही कारणास्तव करार झाला नव्हता. झहीरच्या येण्याने भारतीय गोलंदाजीला अजून जास्त धार येण्याची शक्यता आहे.

व्यवस्थापनात नाराजीचे सूर
भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल होऊन काही तास उलटतात न उलटतात, तोच बीसीसीआयने प्रशिक्षक निवडीसाठी अर्ज मागवणे आश्चर्याचे ठरले आहे. कुंबळेंच्या आग्रही भूमिकेबद्दल बीसीसीआयमध्ये स्पष्ट नाराजी दिसून आली आहे. निवड समितीत मुख्य प्रशिक्षकाला स्थान असावे, या मागणीने देखील व्यवस्थापनात नाराजीचे सूर आहेत. कुंबळेंची ही मागणी लोढा समितीच्या शिफारशीमध्ये देखील न बसणारी आहे. राष्ट्रीय निवड समितीत केवळ तीन सदस्यांचा समावेश असावा, असे लोढा समितीने यापूर्वी म्हटले होते. बीसीसीआयच्या नियमावलीनुसार, प्रशिक्षक किंवा कर्णधार निवड समितीच्या बैठकींना हजर राहू शकतात. पण, ते आपले मत नोंदवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत कुंबळेंची शिफारस मान्य करण्यासाठी मंडळाला घटनात्मक बदल करावे लागतील आणि ते यासाठी राजी नसतील, हे जवळपास स्पष्ट आहे. कुंबळे यांनी अलीकडेच खेळाडूंच्या व स्वतःच्या मानधनात जबरदस्त वाढ मागितली आणि आपल्या या भूमिकेबद्दल ते अतिशय आग्रही राहिले. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय या माजी महान फिरकीपटूवर तीव्र नाराज असल्याचे संकेत आहेत.

नेमणूक प्रक्रिया नियमानुसार
संघाच्या प्रशिक्षक नेमणुकीची प्रक्रिया ही नियमानुसार आहे. दरवेळी प्रमाणेच त्यात बदल झालेला दिसत नाही, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. यावेळी विराट पत्रकारांशी बोलत होता. संघाच्या प्रशिक्षक नेमणुकीची प्रक्रिया सर्वांसाठी समान आहे. याही वेळेस पूर्वीसारखीच प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे मला त्यात काहीच फरक दिसत नाही, असे कोहली म्हणाला. मँचेस्टरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या बाबतीत आम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नसल्याचे देखील विराट म्हणाला. मागील वर्षी 23 जून रोजी कुंबळे यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या कार्यकाळात संघाने तगड्या संघांविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्या आहेत.