कोल्हापूर: २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली. लोकांनी त्यांना संधी देखील दिली, पण पाच वर्षांत त्याचे सोने करता आले नाही, त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रातही जनता सत्ता बदल करण्याच्या विचार करत आहे. राज्यात तर आघाडीचीच हवा आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार चार वेळा राज्याच्या दौऱ्यावर यावे लागत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलीच टीका केली.
‘चार वर्षांपूर्वी मोदी काश्मीरमध्ये गेले, तेथे विकासाचा कार्यक्रम मांडला. तेथील जनेतेने त्याचे स्वागत केले. पण चार वर्षांत त्यातील एकाही मुद्याची अमंलबजावणी झाली नाही. यामुळे तरुण पिढी संतप्त झाली आहे. तेथील जनतेचा विश्वास ते संपादन करू शकले नाहीत. त्याचा दोष ते इतरांवर ढकलत आहेत,’ असेही पवार म्हणाले.