आघाडीच्या बैठकीनंतरच ठरणार जिल्हा बँकेचा कॅप्टन
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची माहिती ; जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी ३ रोजी निवड
जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते चेअरमनपदाचे. जिल्हा बँकेत राष्ट्रवादीच्या सर्वाधिक ११ जागा निवडुन आल्याने याच पक्षातील संचालकाला चेअरमन होण्याची संधी मिळेल अशी चर्चा होत आहे. मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीनंतरच चेअरमनपदाचे नाव निश्चीत होईल अशी माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने २१ पैकी २० जागांवर दणदणीत विजय मिळविला. या २० संचालकांचे पक्षीय बलाबल लक्षात घेता राष्ट्रवादीचे ११, शिवसेनेचे ६ आणि काँग्रेसचे तीन संचालक निवडुन आले आहे. संख्याबळानुसार जिल्हा बँकेत राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे चेअरमन पदाची पहिली संधी राष्ट्रवादीला मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्या पाटील, डॉ. सतीश पाटील, अॅड. रोहिणी खडसे, संजय पवार यांचे नाव चर्चेत आहे. तर शिवसेनेकडुन आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीत कुठल्याही नावावर अद्याप निश्चीती झाली नसल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी दिली.
बैठकीनंतर चेअरमन ठरणार
जिल्हा बँकेची निवडणुक महाविकास आघाडी म्हणून लढविण्यात आली. त्यामुळे चेअरमनपदाचे नाव निश्चित करतांना महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल. या बैठकीत चेअरमनपद पहिल्यांदा कोणत्या पक्षाला द्यायचे यावर चर्चा होईल आणि त्यानंतर चेअरमन पदाचा उमेदवार निश्चित केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
चेअरमपदासाठी ३ रोजी निवडणूक
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमनपदाच्या निवडीसाठी दि. ३ डिसेंबर रोजी दु. १ वा. अध्यासी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया होणार आहे. दि. ३ रोजी दुपारी १ ते १.१५ वा. नामनिर्देशनपत्र दाखल करणे, दु. १.१५ ते १.२५ वा. नामनिर्देशनपत्राची छाननी, दु. १.३० वा. छाननी, दु. १.३५ ते १.४५ अर्ज माघार घेणे, दु. १.५० वा. उमेदवारांची यादी जाहीर करणे दु. २ ते २.३० यावेळेत आवश्यकता असल्यास मतदान (गुप्त पध्दतीने), मतदानानंतर निकाल जाहीर करणे असा कार्यक्रम निश्चीत करण्यात आला आहे. ही निवड प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे.