पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये समान विचारधारा असलेल्या पक्षांसोबत युती करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यानुसार 2019च्या निवडणुका काँग्रेससोबत लढवणार असल्याची घोषणा पवार यांनी पालघर येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने गत विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. याचा राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला होता. त्यांना सत्ता गमवावी लागली होती. दरम्यान, भाजप-शिवसेनेने निवडणुकीनंतर एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’ला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांची चर्चा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी झाली होती. राष्ट्रवादीने आघाडीबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पवारांनी समान विचारधारा असलेल्या पक्षांसोबत युती करणार असल्याचे संकेत दिल्याने आघाडीत जोश निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात आघाडीच्या रणनीतीपुढे शिवसेना- भाजप युती फिकी पडणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. कारण महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे राज्य सरकार अस्तित्वात आहे. परंतु, दोन्ही पक्षांत टोकाचे मतभेद आहेत.
शिवसेनेने आगामी 2019च्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा इशारा भाजपला दिला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला नाईलाजाने स्वबळावर लढावे लागेल. नाहीतरी भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा भिनल्यामुळे ते म्हणत आहेत की, आम्ही स्वबळावरच लढणार. ही भाजपमधील काही नेत्यांची भूमिका पक्षाला व युतीतील सर्वच सहभागी पक्षांना अडचणीत टाकण्याची भूमिका वाटते. असो, काँग्रेस व राष्ट्रवादीने महाराष्ट्रात एकत्रित निवडणुका लढल्यास आघाडीला ‘अच्छे दिन’ येतील. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण व सत्ताकारणाला कलाटणी मिळणार असल्याची चिन्हे दिसत असून, शरद पवारांच्या वक्तव्याचे स्वागतच आहे.
पालघर येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, मोदी मुख्यमंत्री असतानाचे भाषण ऐकले. छोट्या विकासापेक्षा मोठी स्वप्नं दाखवून लोकांच्या विचारांवर प्रभाव टाकता येतो, प्रकल्पाची व्यवहार्यता पाहायची गरज नाही, असं ते म्हणाले. बुलेट ट्रेनमध्ये लोक बसोत न बसोत लोकांवर परिणाम हवा, हा युक्तिवाद होता. मग बुलेट ट्रेनचा राज्याला काय फायदा? मोदींच्या धोरणांवर टीका करताना पवार म्हणाले, नोटाबंदीने काळा पैसा येईल, अतिरेकी कारवाया थांबतील, असे मोदी म्हणाले होते तसेच आपला एक माणूस मारला तर आम्ही 10 मारू, असेही म्हणाले होते. मोसूलमध्ये 39 भारतीय मारले गेले त्याला वर्ष झाले. मात्र, सरकारला कळले नाही. इंदिराजींनी 1971 मध्ये लष्करी कारवाई करून पाकिस्तानला नमवत बांगलादेशची स्थापना केली, ती खरी हिंमत. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त पालघरच्या दौर्यावर असताना पवार म्हणाले, आम्ही पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समान विचारांच्या पक्षांसोबत मिळून लढवणार आहोत. दरम्यान, राहुल गांधी यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत युती झाली तर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर चर्चा झाली नाही. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बुलेट ट्रेनच्या संकल्पनेच्या गरजेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. प्रकल्पांमुळे पर्यावरणाची हानी होणार म्हणून पालघरमधील जनतेत असंतोष आहे. स्थानिकांच्या भावना वाढवणे बंदराच्या बांधकामाबाबतदेखील तीव्र आहेत.
विकासकामामुळे मत्स्यव्यवसाय, चिक्कू बागा उद्ध्वस्त होत असतील तर असे विकास प्रकल्प घेण्याबाबत जनतेची नाराजी मी केंद्र शासनाकडे पोहोचवेन. शरद पवार हे राज्यातील राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे विविध घटक पक्षांना एकत्रित करण्याचे कौशल्य आहे. काँग्रेससोबत राष्ट्रवादीची युती म्हणजे विरोधकांचा राज्यात पराभव निश्चित समजला जात आहे. 2009 ते 2014 या कालावधीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे आघाडी सरकार राज्यात होते. त्यावेळी या दोन्ही पक्षांत टोकाचे वाद होते. अगदी जागावाटपापासून मोठा तिडा होता. दोन्ही पक्षांतील मतभेद मिटणे आणि दोघांनी सामंजस्याने जागा वाटप करून 2019ची निवडणूक लढवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ’ये रे माझ्या मागल्या’ असे व्हायला नको, हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात शेतकर्यांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत, त्याच्या शेतमालाला योग्य भाव दिला जात नाही, कर्जमाफीचे घोंगडे भिजत पडले आहे. राज्यात अनेक समस्या आहेत, तिकडे पाहायला सरकारला वेळ नाही. कधी नव्हे तो युतीच्या कार्यकाळात शेतकर्यांचा संप झाला. काँग्रेस व राष्ट्रवादीवर मतदारांचा मोठा भरवसा आहे. त्यामुळे आघाडीतील पक्षांवर तेवढीच मोठी जबाबदारी आहे. शरद पवार यांनी पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये समान विचारधारा असलेल्या पक्षांसोबत युती करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातील सद्यःस्थितीतील राजकारण, सत्ताकारणाला कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे आघाडीतील सहभागी पक्षांनी आता 2019च्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याची गरज आहे.
– अशोक सुतार
8600316798