आघाडी कायम राखण्याचे लक्ष्य

0

पल्लेकेले । दाम्बुला येथे खेळल्या गेलेेल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर नऊ विकेट्सनी विजय मिळवणार्‍या भारतीय संघासमोर पल्लेकेल येथे होणार्‍या दुसर्‍या सामन्यातही त्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचे लक्श्य असेल. शिखर धवनने या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना नाबाद 132 धावा केल्या होत्या. कर्णधार विराटनेही नाबाद 82 धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. तर दुसरीकडे भारतीय संघाचा विजयी वारू रोखण्यासाठी श्रीलंकेचा कर्णधार ऊपुल थरांगाला बरीच माथाचेपी करावी लागणार आहे. वेस्टइंडिजच्या दौर्‍यात कोहलीने संघात फारसे बदल केले नव्हते. एकदिवसीय सामन्यांसाठी भारताने दोन लेग स्पिनर्स किंवा दोन डावखुरे फिरकी गोलंदाज खेळवले नाहीत. त्याऐवजी चहल आणि पटेल अशी ऑर्थोडॉक्स लेग ब्रेक आणि डावखुरा फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश होता. एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंकेतील खेळपट्ट्याचा विचार केला तर संघात तिसरा फिरकी गोलंदाज खेळवण्याची हौस भारतीय संघाला न परवडणारी आहे. पल्लेकेलची खेळपट्टी एकदम निर्जिव आहे. त्यामुळे कुलदीप यादवसह मनीष पांडे, अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूरला या सामन्यातही बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. फलंदाजीत केदार जाधव आणि लोकेश राहुलला जास्त संधी मिळण्यासाठी कोहली स्वत:च्या फलंदाजीच्या क्रमात बदल करण्याची शक्यता आहे.

उभय संघ भारत –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के.एल. राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोणी, हार्दिक पंड्या, अक्शर पटेल, कुलदीप यादव, युझूवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वरकुमार, शार्दूल ठाकूर.

श्रीलंका –
ऊपुल थरांगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, निरोशान डिक्वेला (यष्टीरक्शक), धनुष्का गुणतिलका, कुसाल मेंडिस, चामुरा कापुगेदरा, मिलींडा सिरीवर्धना, मिलींडा पुष्पकुमारा, अकिला दनाजंय, लक्शन संदाकन, थिसेरा परेरा, वानींडू हसारंगा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चामिरा, विश्‍व फर्नांडो.

संघाचे अनेक मार्गदर्शक
या मालिकेतील श्रीलंकेच्या सततच्या पराभवांमुळे संघ निवडीबद्दल प्रश्‍न विचारले जात आहेत. कसोटी कर्णधार आणि श्रीलंकेच्या संघातील सर्वात आक्रमक फलंदाज दिनेश चंडीमल एकदिवसीय मालिकेत खेळत नाही आहे. त्यामुळे एकदिवसीय संघाचा कर्णधार उपुल थरांगा सलामीला फलंदाजीसाठी येण्याऐवजी चंडीमलच्या जागेवर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत आहे. याशिवाय श्रीलंकेच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा आहे. कर्णधार आणि प्रशिक्शक एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत आहेत.

पहिल्या सामन्यानंतर माध्यमांशी झालेल्या चर्चेच्यावेळीस चंडीमल संघातून का वगळले असा थेट प्रश्‍न संघाचे प्रशिक्शक निक पोथास यांना विचारण्यात आला. त्याचवेळी संघाचे व्यवस्थापक गुरूसिन्हा आणि निवड समितीचे प्रमुख सनथ जयसूर्या यांच्या हस्तक्शेपासंबधीच्या प्रश्‍नाला उत्तर देताना पाथस म्हणाले की, संघाचे अनेक मार्गदर्शक आहेत. पण श्रीलंकेच्या संघाला भारताच्या आव्हानाचा सामना करता आलेला नाही हे तितकेच खरे आहे.

श्रीलंकेवर टांगती तलवार
इंग्लंडमध्ये 2019 मध्ये होणार्‍या आयसीसी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी आणि 30 सप्टेंबरपर्यंत क्रमवारीत वेस्टइंडिजला मागे ठेवायचे आहे ठेवण्यासाठी श्रीलंकेला या मालिकेतील दोन सामने जिंकावे लागणार आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांना आता जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने 28 व्या षटकापर्यंत 3 बाद 150 धावा केल्या होत्या. धनुष्का गुणतालिका, निरोशन डिक्वेला आणि कुशाल मेंडिसने उपयुक्त फलंदाजी केली होती. या तिघांचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही.