नॉर्थ साउंड । वेस्ट इंडिजविरुद्ध शुक्रवारी होणार्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. पाच सामन्यांच्या मालिकेतील पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेला दुसरा सामना 150 धावांनी जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याआधी क्वीन्स ओव्हल पार्कवर झालेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दुसर्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत यजमान संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले होते. अजिंक्य रहाणे, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने चांगली फलंदाजी करत संघाला वेस्ट इंडिजमधील सर्वात मोठा विजय मिळवून दिला होता. रहाणेने या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे शतक पूर्ण केले होते. याशिवाय धवन आणि कोहलीने अर्धशतकी खेळी करत संघाला 5 बाद 310, अशी मजबूत धावसंख्या उभारून दिली होती.
तिसर्या सामन्यात या तिघांसह महेंद्रसिंग धोनी, युवराजसिंगला मधल्या फळीत चांगली कामगिरी करावी लागेल. याशिवाय हार्दिक पंड्या, केदार जाधव या अष्टपैलू खेळाडूंमुळे संघाची फलंदाजी मजबूत झाली आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, उमेश यादव नवीन चेंडू हाताळतील. त्यांच्या जोडीला हार्दिक पंड्या असेल. फिरकी गोलंदाजीत आर, अश्विन आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या कामगिरीकडे लक्ष असेल. मालिकेत 0-1 अशा पिछाडीवर पडलेल्या कॅरेबियन संघाने दोन बदल केले आहेत. शाई होप आणि कायल होप समावेशामुळे संघाचे नशीब पालटेल, अशी यजमान संघाची आशा आहे. पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू न वेस्ट इंडिजचा संघ सामन्यात भारतीय संघाला कडवी लढत देईल, अशी आशा आहे.
पंतला संधी मिळण्याची शक्यता
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात जागा मिळालेल्या ऋषभ पंतचा तिसर्या एकदिवसीय सामन्यासाठी अकरा जणांच्या संघात समावेश होण्याची शक्यता आहे. कर्णधार संघातील पंतच्या समावेशबद्दल सूतोवाच केले आहे. संघातील महेंद्रसिंग धोनी आणि युवराजसिंग सारख्या वरिष्ठ खेळाडूंना छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे ऋषभ पंतच्या सामन्यात खेळण्याच्या आशा वाढल्या आहेत. दुसर्या सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीने संघात बदल होण्याची शक्यता वर्तवली होती.
उभय संघ
भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, उमेश यादव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, मोहम्मद शामी, ऋषभ पंत
वेस्ट इंडिज
जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अॅब्रीस, देवेंद्र बिशू, रॉस्टन चेस, मिग्युएल कमिन्स, कायल होप, शाई होप, अल्झारी जोसेफ, एविन लेविस, जेसन मोहम्मद, अॅश्ले नर्स, किरेन पॉवेल, रॉवमन पॉवेल.
सामना सुरू होण्याची वेळ
भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता.