‘जनशक्ती’ने दिले होते शिवसेनेतील राजकीय भूकंपाच्या हालचालीचे वृत्त : आघाडी सरकार फुटीच्या उंबरठ्यावर ?

‘दैनिक जनशक्ती’चा अंदाज ठरला खरा : महिनाभरापूर्वीच वर्तवले होते भाकीत

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कुरबुरी सुरू असतानाच राष्ट्रवादीसोबत काडीमोड घेण्यासाठी शिवसेनेतील एक गट आग्रही होता व त्या संदर्भात 27 मे रोजी ‘शिवसेनेत हालचाली गतिमान, राजकीय भूकंपाचे संकेत’ या आशयाचे वृत्त ‘दैनिक जनशक्ती’ने प्रथम पानावर प्रसिद्ध केले होते. ‘जनशक्ती’चे मुंबई विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी वर्तवलेले भाकीत अखेर ठरले आहे. विधान परीषद निवडणुकीत शिवसेनेची मते फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गटातील 13 आमदारांसह नॉट रीचेबल झाले असून सर्व लोकप्रतिनिधी हे गुजरातच्या सुरतमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आल्याने शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या शक्यता बळावल्या आहेत तर महाविकास आघाडी सरकार राहणार की कोसळणार? याबाबत राजकीय मंथन सुरू झाले आहे.

महाविकास आघाडीचे आमदार फुटले
विधान परीषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे दोन उमेदवारही अगदी काठावर पास झाल्याने आघाडीचे अनेक आमदार फुटल्याचे बोलले जात असतानाच शिवसेनेचे तब्बल 13 आमदार गुजरातच्या सुरतमधील हॉटेल मेरीडीयनमध्ये आहेत. हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती असून गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचे समोर आलं आहे. सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचेही समोर आलं आहे.

अनेक आमदार नॉट रिचेबल
शिवसेनेचे राज्यातील काही आमदार हे नॉट रीचेबल असून त्यात उस्मानाबादेतील शिवसेनेचे उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, बुलडाण्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड नॉट रीचेबल आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार संजय नॉट रीचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणमधील 2 आमदार सोबत आहे. ठाण्यातील 2 आमदार सोबत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

राजकीय भूकंपाची भीती
सोमवारी मंत्री एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे असलेल्या हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.