जळगाव । फेबु्रवारी महिन्यात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची आचार संहिता नुकतीच लागु करण्यात आली असून आचार संहितेचा काटेकोर पालन करावे. कोठेही आचार संहितेचा उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी सुचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून दिली. निवडणूक आचार संहिता लागु झाल्यानंतर राज्यनिवडणूक आयुक्त यांनी नाशिक येथे बैठक घेऊन यासंबंधी सुचना दिलेल्या आहे. जर एखादा शासकीय अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार किंवा प्रसार करतांना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण
निवडणूकीचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार असल्याने अर्ज भरतांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सायबर कॅफे चालक यांना निवडणूक अर्ज भरण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 25 जानेवारी रोजी मतदान दिनानिमित्त मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली. 1 फेंबु्रवारी रोजी दुपारी 3 वाजेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार नाही याची सर्व राजकीय पक्षांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पोलिस अधिक्षक जालिंदर सुपेकर, जिल्हा निवडणूक अधिकारी मनोहर चौधरी आदी उपस्थित होते.
विविध पथकांची नेमणूक
आचार संहितेच्या काळात पैसे वाटप, दारु वाटप, ध्वनी प्रदुषणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस दलातर्फे विशिष्ठ पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगामार्फत एक विशिष्ट प्रकारचे अॅप तयार करण्यात आले असून आचारसंहितेच्या कालखंडात अनुचित प्रकार सुरु असल्यास फोटो काढून अॅपवर अपलोड करावे त्यानंतर संबंधीतावर कारवाई करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.