आचारसंहितेची यंत्रणेने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी

0

नंदुरबार । नंदुरबार, नवापूर, तळोदा नगरपरिषदेची निवडणूक व शहादा नगरपरिषदेच्या पोट निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर आचारसंहितेची शासकीय यंत्रणेने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात निवडणूक संनियंत्रण समितीची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुधीर खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पी.एम. गौड, नगरपालिका मुख्याधिकारी गणेश गीरी, जिल्हा प्रशासन अधिकारी राहुल वाघ यावेळी उपस्थित होते.

निवडणुकीसंदर्भात विविध समित्या स्थापन
जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी यावेळी सांगितले, निवडणूक विषयी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी देण्यात येणार्‍या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवणे, उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चाबाबत माहिती घेणे, रेल्वेस्थानक, हॉटेल्स, फार्महाऊस यांच्यावर लक्ष ठेवणे, तारण, वित्तीय हवाला दलाल यांच्यावर लक्ष ठेवणे, बँकामार्फत होणार्‍या मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे, पेड न्युज पेड स्पेशल कमेटी, सोशल मिडीया व इंटरनेट इत्यांदीवर लक्ष ठेवणे याबाबींवर सनियंत्रण समितीमार्फत कार्यवाही करण्यात येणार असून यावर उपाययोजना करण्यासाठी व्हिडियोग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेकपोस्ट पथक व तक्रार निवारण कक्ष यांची स्थापन करण्याच्या सुचनाही डॉ. कलशेट्टी यांनी यावेळी दिल्या.