जळगाव– गिरणा पाणीपुरवठा अंतर्गत गिरणा पंपिंग,दापोरा पंपिंग येथील मशनरींचा लिलाव करण्याची हालचाल प्रशासनाने सुरु केली आहे.त्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दि.23 रोजी महासभेचे आयोजन केले आहे. मात्र या कालावधित विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास लिलावाचा प्रस्ताव बारगळण्याची शक्यता आहे.
ब्रिटीश काळातील मशिनरी
जळगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटीश काळात सन 1929 मध्ये सावखेडा शिवारात गिरणा पंपिंग स्टेशन उभारण्यात आले होते.याठिकाणी सहा विद्युत पंप होते.त्यानंतर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता दापोरा गावाजवळ 1987 पंपिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आले होते. दापोरा पंपिंग व गिरणा पंपिंग आणि सावखेडा जलशुध्दीकरण केंद्र 1990 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यामार्फत तत्कालीन जळगाव नपाकडे हस्तांतरीत करण्यात आले होते.
आरक्षणाची मुदत संपल्याने योजना बंद
वाघुर धरण कार्यान्वित झाल्यानंतर दापोरा पंपिंगमधून 20 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत होता.मात्र 2011 मध्ये वाघुर धरण पुर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर आणि गिरणातील पाणी आरक्षणाची मुदत संपस्यामुळे गिरणा पंपिंग,दापोरा पंपिंग ,सावखेडा जलशुध्दीकरण केंद्र येथील योजना बंद केल्या.
मशनरींच्या मुल्यांकनानंतर लिलाव
गिरणा पंपिंग,दापोरा पंपिंग ,सावखेडा जलशुध्दीकरण केंद्र बंदवस्थेत असल्यामुळे आणि ब्रिटीशकालीन यंत्रसामुग्री असल्यामुळे दुरुस्ती होणे अशक्य आहे. त्यामुळे यंत्रसामुग्रीचे शासकीय अभिकर्त्यांकडून मुल्यांकन करुन लिलाव करण्यात येणार आहे.
मनपाची 23 रोजी महासभा
गिरणा पाणीपुरवठा अंतर्गत गिरणा पंपिंग,दापोरा पंपिंग येथील मशनरींचा लिलाव करण्याबाबत निर्णय घेणे,मनपा कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे तसेच सुधारित दराने घरभत्ता भाडे लागू करण्यासह 11 विषयांवर चर्चा करण्यासाठी दि.23 रोजी सकाळी 11 वाजता महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होणार आहे.