आचार्य अत्रे प्रेक्षागृहातील वातानुकूलित यंत्रणेचे नुतनीकरण होणार

0

पिंपरी-चिंचवड : संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या आचार्य अत्रे प्रेक्षागृहातील वातानुकूलित यंत्रणेचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 12 लाख रूपये खर्च येणार आहे. स्थायी समितीच्या सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. रसिक, नाट्यसंस्थांनी पुन्हा प्रेक्षागृहाकडे वळावे, म्हणून महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

800 आसनांची क्षमता
महापालिकेच्यावतीने चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह उभारण्यात आले. या प्रेक्षागृहाला नाट्यसंस्था आणि रसिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून महापालिकेतर्फे पिंपरी, संत तुकारामनगर येथे आचार्य अत्रे प्रेक्षागृह उभारण्यात आले. या प्रेक्षागृहाची सुमारे 800 आसनांची क्षमता आहे. सुरुवातीला काही दिवस या प्रेक्षागृहात नाटकांचे प्रयोग झाले. मात्र, प्रेक्षकांची वानवा, वाहतुकीची गैरसोय, पार्किंगचा अभाव, यामुळे या प्रेक्षागृहात नाटकांचे प्रयोगही बंद झाले. सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहमेळावे, बैठका यासाठीच या प्रेक्षागृहाचा उपयोग होऊ लागला आहे.

आनंद रेफ्रिजरेशनसोबत करार
काही दिवसांपासून या प्रेक्षागृहाची दुरवस्था झाली आहे. प्रेक्षागृहात वातानुकूलित यंत्रणेची सोय होती. मात्र, ती सुद्धा बर्‍याचदा बंद असते. रसिकांनी, नाट्यसंस्थांनी पुन्हा या प्रेक्षागृहाकडे वळावे, याकरिता महापालिकेने प्रेक्षागृहातील वातानुकूलित यंत्रणेचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छूक ठेकेदारांकडून निविदाही मागविण्यात आल्या. त्यानुसार तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये आनंद रेफ्रिजरेशन या ठेकेदाराने 6 टक्के कमी दर सादर केला. इतर ठेकेदारांपेक्षा त्यांची निविदा कमी दराची असल्याने त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.