सासवड । आचर्य अत्रे यांचे लिखाण समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. समाजासाठी त्यांची कल्याणकारी भूमिका होती. त्यांचे लिखाण मनोरंजनात्मक, हसवणारे वाटले तरी त्यामागे समाज सुधारणेची दृष्टी होती, असे प्रतिपादन भारत सासणे यांनी केले. सासवड येथे 20 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये आचार्य अत्रे यांचे साहित्य या विषयावरील परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
अत्रे यांचे जीवन मधमाश्यांच्या पोळ्यासारखे होते. त्यात गोडवा होता व डंखही होता. त्यांनी कर्हेचे पाणी हे आत्मचरित्र लिहिले, नाटके लिहिली, चित्रपट काढले, पत्रकारिता केली. याचबरोबर त्यांनी कथा लेखनही केले. मात्र, कथालेखनाची फारशी दखल घेतली गेली नाही. आता त्या कथांची दखल घेतली पाहिजे. आज परिस्थिती गंभीर आहे, अस्वस्थता आहे, विदूषकांच्या हाती कारभार असल्यासारखे झाले आहे. पण कोणी बोलावयास तयार नाही, टीका होत नाही, समाजावर काय परिणाम होतो हे सांगत नाही पोकळी निर्माण झाली आहे. अत्रे आज असते तर त्यांनी आसूड घेऊन कोरडे ओढले असते, असे सासणे यांनी पुढे सांगितले.
सासवड येथील डॉ. जगदीश शेवते यांनी अत्रे यांच्या कर्हेचे पाणी या आत्मचरित्रावर प्रबंध लिहून पीएचडी मिळवली. अत्रे यांचे आत्मचरित्र म्हणजे मराठी साहित्यातील अलौकिक घटना आहे. त्यांचे मी कसा झालो हे पुस्तक लिहिल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास लिहण्यासाठी कर्हेचे पाणी लिहिले, असे डॉ. शेवते यांनी सांगितले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्रवीण दवणे, प्रशांत वांढेकर व्यासपिठावर उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या संमेलनात कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, बाल आनंद मेळावा असे कार्यक्रम झाले. संमेलनाध्यक्ष प्रवीण दवणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला भरपूर वाचन करा, ज्या क्षेत्रात जाल तेथे यश मिळवा असे आवाहन केले. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, स्वागताध्यक्ष दशरथ उर्फ बंडूकाका जगताप, जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, प्रतिष्ठा चे उपाध्यक्ष खाजाभाई बागवान, अॅड. अण्णासाहेब खाडे, वसंत ताकवले, शिवाजी घोगरे, शांताराम पोमण, हनुमंत चाचर, गौरव कोलते आदी उपस्थित होते. जेजुरी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयाने संमेलनाचे नियोजन केले. सचिन धनवट यांनी सूत्रसंचालन तर कार्यक्रम प्रमुख कलाताई फडतरे यांनी आभार मानले.