मुंबई – आजचा अर्थसंकल्प दिशाहिन आणि जनतेची दिशाभूल करणारा होता अशी टिका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी केली. आर्थिक पाहणी अहवालात ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्याप्रमाणे आज अर्थमंत्र्यांनी त्याचा खुलासा करणे गरजेचे होते. राज्याचा आर्थिक विकास दर किती राहणार हे देखील सांगितले पाहीजे होते.
हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी असल्याचे सांगितले. मात्र शेतीसाठी कुठेही तरतूद केलेली नाही. शेतीचे उत्पन्न दुप्पट कसे करणार ? याबद्दलही काही माहिती दिली नाही. अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तूट अपेक्षित धरली आहे. यावरून सरकारची आर्थिक बेशिस्त व आर्थिक चणचण किती आहे, हे दिसून येते अशी टिकाही दिलीप वळसेपाटील यांनी केली. राज्यातील शेतकरी, जनता व सर्वच घटकांचा भ्रमनिरास करणारा असा हा अर्थसंकल्प आहे.
आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे तुटीचे समर्थन जरी मुख्यमंत्री करत असले तरी याआधी आघाडी सरकारच्या काळात ५ हजार कोटींच्या पलीकडे तूट गेली नव्हती. गेल्या चार वर्षात आर्थिक तूट वाढत चालली आहे. राज्यावरचे कर्जही वाढत चालले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेले आंतरराष्ट्रीय मानकाचे समर्थन योग्य नाही.